निगडीतील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर; दामिनी पथकाची गस्त वाढविण्याची मागणी
निगडी दि,31: निगडी परिसरातील शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. निगडी गावठाणातील मारुती मंदिर ते यमुनानगर येथील बोल्हाई माता मंदिर या मार्गावर विद्यार्थिनींना त्रास देणे, भरधाव वाहन चालवणे आणि वाहनांच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचे प्रकार होत असल्याचा दावा भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर काळभोर यांनी निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांची भेट घेत निवेदन साद केले. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत संबंधित मार्गावर दामिनी पथकाची नियमित गस्त वाढवावी, तसेच पोलिसांची उपस्थिती वाढवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
प्रसन्नपुरम बिल्डिंग कॉर्नर ते यमुनानगर कॉर्नर या मार्गावर माता अमृतानंदी शाळा, मॉडर्न शाळा आणि एस.पी.एम. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनींची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. याच मार्गावर काही वाहनचालकांकडून मोठ्याने हॉर्न वाजवणे, वेगाने वाहने चालवणे आणि विद्यार्थिनींना घाबरवण्याचे प्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकारांमुळे विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होत असल्याचे काळभोर यांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे शालेय वेळेत पोलिसांची गस्त वाढविण्यासोबतच संशयित वाहनचालकांवर लक्ष ठेवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सीसीटीव्हीच्या माध्यमातून परिसरावर नजर ठेवावी
संबंधित मार्गावरील संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख वाढवावी आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
“विद्यार्थिनींची सुरक्षितता हा अत्यंत गंभीर विषय आहे. प्रशासनाने तक्रारींची तातडीने दखल घेऊन शालेय परिसर आणि मार्गांवर प्रभावी सुरक्षा व्यवस्था निर्माण करावी,” अशी भूमिका सचिन काळभोर यांनी व्यक्त केली.
