अकोल्यात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण ;
• जिल्हा गुंतवणूकदार शिखर परिषदेत उद्योजकांना आवाहन
• सुमारे ८० उद्योगांमधून ₹८०० कोटींच्या प्रस्तावित गुंतवणुकीवर भर
अकोला, दि.01 : अकोला जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, मुबलक औद्योगिक जमीन, कृषी व कृषी प्रक्रिया उद्योगांची मोठी क्षमता, कुशल मनुष्यबळ तसेच रेल्वे व रस्ते वाहतुकीची सक्षम जोडणी उपलब्ध आहे. या अनुकूल वातावरणाचा लाभ घेऊन उद्योजकांनी अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी आणि मूल्यवर्धित उद्योगांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज केले.
जिल्हा उद्योग केंद्र यांच्या व्दारे हॉटेल आरजी इक्सक्यूलिव्ह येथे आयोजित जिल्हा गुंतवणूकदार शिखर परिषदेचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या परिषदेला अमरावती विभागाच्या सहाय्यक आयुक्त सौ. रंजना पोळ, महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा (मैत्री) चे नोडल अधिकारी नरेंद्र औटी, एमआयडीसीचे व्यपस्थापकीय संचालक राजेंद्र जाधव, अकोला इंडस्ट्रीयल असो.चे मनोज खंडेलवाल, नीरज व्होरा, सनदी लेखापाल अंकित गुप्ता, पंकज अग्रवाल, जिल्हा उद्योग केंद्राचे सहाय्यक आयुक्त संतोष बनसोड, नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक सादीक अली यांच्यासह एमआयडीसी व जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी, उद्योजक तसेच संभाव्य गुंतवणूकदार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, अकोला जिल्ह्याचे स्थान उत्तर व दक्षिण भारतातील बाजारपेठांशी जोडणारे असून, रेल्वे व महामार्गांच्या माध्यमातून मालवाहतूक आणि बाजारपेठांपर्यंत पोहोच सुलभ आहे. समृद्धी महामार्गाशी असलेली जोडणी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जिल्ह्यातील शिवनी विमानतळ विस्तारीकरणाच्या 200 कोटींच्या कामास शासनाकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून, यामुळे निर्यातदारांना उत्पादन निर्यातीसाठी याचा फायदा होणार आहे. जिल्ह्यातील विद्यमान उद्योगांना अधिक बळकटी देतानाच नवीन उद्योगांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यात सुमारे १ हजार ४४ हेक्टर एमआयडीसीचे औद्योगिक क्षेत्र उपलब्ध असून, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी सुमारे १९० औद्योगिक भूखंड उपलब्ध असल्याची त्यांनी सांगितले. नवीन उद्योग उभारू इच्छिणाऱ्या उद्योजकांनी उपलब्ध भूखंडांची माहिती घेऊन औद्योगिक गुंतवणुकीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
त्या पुढे म्हणाल्या की, अकोला जिल्ह्यातील मजबूत कृषी अर्थव्यवस्था, कापूस उत्पादन, डाळ मिल उद्योग तसेच कृषी प्रक्रिया उद्योग ही जिल्ह्याची प्रमुख आर्थिक ताकद आहे. त्यामुळे केवळ कच्च्या कृषी उत्पादनाच्या विक्रीऐवजी मूल्यवर्धित उत्पादन उद्योग, अन्नप्रक्रिया, कापूस आधारित उद्योग आणि निर्याताभिमूख उद्योगांना चालना देण्यात यावी. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून उपलब्ध कृषी विषयक तज्ज्ञता, कृषी क्षेत्रातील नानाविध संशोधन तसेच कुशल व अर्धकुशल मनुष्यबळाचा उपयोग करून जिल्ह्यात नव्या उद्योगांना चालना द्यावी, असे त्यांनी सांगितले. अकोला जिल्ह्यातील कृषी व कृषी प्रक्रिया उत्पादनांना देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी निर्यातक्षम उत्पादनांची ओळख, उत्पादनाची गुणवत्ता, आकर्षक पॅकेजिंग, आवश्यक प्रमाणपत्रे आणि मूल्यवर्धन यावर उद्योजकांनी भर द्यावा, असे आवाहन करण्यात आले.
