सुशासन सप्ताहानिमित्त आयोजित बैठकीत केल्या सूचना
सोलापूर,दि.23: शासकीय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची कामे संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तळमळीने तसेच वेळेत व पारदर्शकतेने करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिल्या.केंद्र शासनामार्फत दि. 19 ते 25 डिसेंबर या कालावधीत सुशासन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, तहसिलदार अंजली मरोड, तहसिलदार दत्तात्रय मोहाळे, नायब तहसिलदार आर.व्ही.पुदाले, बालाजी बनसोडे, माजी जिल्हाधिकारी गोकुळ मवारे, केशव शिंदे तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. शंभरकर म्हणाले, सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात आलेल्या नागरिकांची कामे तळमळीने, निष्ठेने व पारदर्शीपणे केल्यास सुशासन सप्ताह राबविण्याची गरजच शासनास पडणार नाही. आपण ज्या कार्यालयात काम करतो तेथे जे अधिकारी आपणांस मिळाले आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाचा योग्य वापर करून सर्वसामान्यांची कामे तात्काळ मार्गी लावावीत. प्रत्येक काम मुदतीत पूर्ण करावे. तसेच तक्रारींचा तात्काळ निपटारा करण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे म्हणाले, सुप्रशासन हा चर्चेचा विषय नसून यावर तात्काळ कृती करण्याची गरज आहे. सर्वांनी नियोजनबध्द पध्दतीने कामकाज करावे. येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे काम आपलेच काम आहे असे समजून केल्यास कोणाचीही कामे प्रलंबित राहणार नाहीत. कामेच प्रलंबित राहिली नाहीत तर तणाव देखील येणार नाही.निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार म्हणाल्या, कर्मचाऱ्यांनी मान्यवरांनी दिलेल्या तसेच शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून कामे केल्यास आपल्या जिल्ह्यामध्ये नक्कीच सुप्रशासन निर्माण होईल. जिल्ह्यात सुप्रशासन निर्माण करण्यासाठी प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी माजी जिल्हाधिकारी श्री. मवारे यांनी काम करताना येणाऱ्या अडचणी, त्यावर करावयाचे उपाय याबद्दल सोदाहरण मार्गदर्शन केले. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना अधिकच्या कामामुळे जो ताण तणाव जाणवतो या तणावापासून आपल्याला कसे दूर राहता येईल याबद्दलचे सविस्तर असे मार्गदर्शन केशव शिंदे यांनी केले.शासकीय कर्मचाऱ्यांनी शासनाने दिलेल्या सूचनेनुसार कामकाज करावे. तसेच कामाचा निपटारा करण्याकरिता नवनवीन उपाययोजना राबवाव्यात. शासकीय कार्यालयामध्ये कामाकरिता येणारे सर्वसामान्य नागरिक समाधानाने परत गेले पाहिजेत, असे तहसिलदार मरोड यांनी सांगितले. तसेच, या सुशासन सप्ताहामध्ये कोणती कामे होणे अपेक्षित आहे याबद्दलची माहिती त्यांनी यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना दिली.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा
जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 बाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे आढावा घेण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्त शिरीष सरदेशपांडे, प्रभारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मिळालेला निधी यंत्रणांनी गांभीर्याने व विहित वेळेत खर्च करावा. त्यासाठी मान्यता व अन्य कार्यवाही प्राधान्याने करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी यावेळी दिले.
जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 च्या कार्यान्वयनास झालेला विलंब, लवकरच होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमुळे जिल्ह्यात लागणारी आचारसंहिता इत्यादींचा विचार करता मार्च 2023 अखेरपर्यंत निधी खर्च करण्यासाठी कमी कालावधी मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीत यंत्रणास्तरावर निधी खर्च करण्याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच, यापूर्वी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित मुद्यांचे कार्यपालन अहवालांबाबत (Action Taken Report) आढावा घेण्यात आला. याबरोबरच, जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2023-24 करिता प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी करावयाच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.
मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचा रविवारचा सोलापूर जिल्हा दौरा कार्यक्रम
सोलापूर, दि. 23, (जि. मा. का.) : मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचा रविवार, दि. 25 डिसेंबर 2022 रोजीचा सोलापूर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे - दुपारी 1.15 वा. सोलापूर विमानतळ येथे आगमन व हॅलिकॉप्टरने शेदगाव-भाळवणी, ता. करमाळा, जि. सोलापूरकडे प्रयाण, दुपारी 1.30 वा. आदिनाथ सहकारी साखर कारखाना लि., शेदगाव भाळवणी, हेलिपॅड येथे आगमन. दुपारी 1.35 वा. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा 27 वा ऊस गळीत हंगाम शुभारंभ, स्थळ : आदिनाथ सहकारी साखर कारखाना लि., शेदगांव भाळवणी, दुपारी 02.30 वा. शेदगाव-भाळवणी, ता. करमाळा येथून हेलिकॉप्टरने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण, दुपारी 2.45 वा. सोलापूर विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने नागपूरकडे प्रयाण.

