भक्तिमय वातावरणात श्री मोरया गोसावी महाराज यांच्या ४६२ व्या संजीवन समाधी महोत्सवाची सांगता

0 झुंजार झेप न्युज

भक्तिमय वातावरणात श्री मोरया गोसावी महाराज यांच्या ४६२ व्या संजीवन समाधी महोत्सवाची सांगता 

पिंपरी चिंचवड,दि.04: दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या ४६२ व्या संजीवन समाधी महोत्सवाचे भक्तिमय वातावरणात समारोप झाला. श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सवाचे यंदा ४६२ वे वर्ष आहे. संजीवन समाधी महोत्सवाचा भक्तिमय सोहळा सलग ५ दिवस सुरू होता, या सोहळ्यात भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने सहभाग नोंदविला. तसेच प्रख्यात कलाकारांनी देखील मोठ्या ताकदीने आपली कला श्री मोरया चरणी अर्पण केली. शास्त्रीय संगीत, व्याख्यान, कीर्तन, अथर्वशीर्ष पठण, भावगीतांचा कार्यक्रम, जीवनगौरव पुरस्कार अशा विविध कार्यक्रमांनी हा सोहळा अविस्मरणीय ठरला. यावेळी 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया 'च्या जय घोषात परिसर दुमदुमला होता.

महोत्सवाच्या प्रत्येक दिवशी पहाटे सकाळी ५ वा. देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव व चिंचवड ब्रम्हवृंद यांच्या हस्ते श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या संजीवन समाधीची महापूजा संपन्न झाली. तसेच दररोज नितीन दैठणकर आणि तुकाराम दैठणकर यांचे चौघडा वादन झाले. पाचव्या दिवशी श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली, या कार्यक्रमास अनेक धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली. 

दररोज श्री मोरया गोसावी महाराज यांचे ओवीबद्ध चरित्र पठण व स्थानिक भजनी मंडळाच्या सेवा देखील करण्यात आल्या.शेवटच्या दिवशी दुपारच्या सत्रात पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते महाप्रसादाचा संकल्प करण्यात आला, व महाप्रसादाचे वाटप सुरू करण्यात आले. या महाप्रसादाचा हजारोंच्या संख्येने भाविकांनी लाभ घेतला. 

सायंकाळी ६ वा. मंदिराच्या कमानी समोर स्वराज्य ढोल ताशा पथकातर्फे श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराजांना मानवंदना देण्यात आली. श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिरावर डोळ्याचे पारणे फेडणारा भव्य आतीषबाजीचा सोहळा संपन्न झाला, हजारो नागरिकांनी हा सोहळा पहिला.

रात्री १० वा. श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिरात, मोरया गोसावी महाराज व श्री चिंतामणी महाराज देव यांनी रचलेल्या पदांचा गाथा यातील २१ पदांची पारंपरिक धुपारती संपन्न झाली. या धुपारतीस हजारो नागरिकांनी अलोट गर्दी केली. यानंतर रात्री २ वा. श्री मंगलमूर्ती वाडा येथे २१ पदांची पारंपरिक धुपारती संपन्न झाली, व अत्यंत पवित्र वातावरणात श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सवाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.