इचलकरंजी शहराजवळील कबनूर गावामध्ये एका डॉक्टरवर प्राणघातक हल्ला करुन त्याच्या गाडीची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
इचलकरंजी: इचलकरंजी शहराजवळील कबनूर गावामध्ये एका डॉक्टरवर प्राणघातक (Attack On Doctor At Ichalkaranji) हल्ला करुन त्याच्या गाडीची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काही अज्ञातांनी या डॉक्टरवर हल्ला केला आहे. हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
कबनूर-रुई ओढ्यालगत 3 अनोळखी व्यक्तींनी या डॉक्टरवर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. विवेक सदाशिव बने (वय 35) असे हल्ला झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे.
मिळालेली माहिती अशी, विवेक यांचे चंदूर येथे रुग्णालय आहे. ते रात्री काम आटपून चार चाकी गाडीने घरी येत होते. यादरम्यान, चंदूर-रुई ओढ्यालगत काही 3 अनोळखी व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले.
त्यानंतर त्यांना तातडीने आय.जी.एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, त्याच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिवाजी पोलीस दाखल होऊन डॉक्टरांना रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी रुग्णालयावर शहरातील डॉक्टरांनी मोठी गर्दी केली. शहरामध्ये वाढत्या मारामारी, खून यासारखे प्रकार वाढल्याने शहरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

