‘पत्रास कारण की...’ रसिकांच्या मनाला भिडला
पिंपरी चिंचवड,दि.07: शब्दांच्या शिल्पातून उमटणाऱ्या भावनांची फुले, कधी वेदनेचा गंध तर कधी आशेचा सुगंध देणारा ‘पत्रास कारण की...’ हा लेखक अरविंद जगताप लिखित पत्रवाचनाचा कार्यक्रम रसिकांच्या हृदयाला भिडला. अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सादर झालेल्या या सादरीकरणाने हरवलेल्या पत्रलेखन परंपरेला नवजीवन दिले. शब्दांच्या ओळींतून वाहणारी माणुसकी आणि संवेदनांचा एकप्रकारे साक्षात्कारच यानिमित्ताने रसिकांना घडला.
पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा यांच्या सहकार्याने, तसेच श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय, भोसरी आणि हुतात्मा चापेकर सार्वजनिक ग्रंथालय, चिंचवड यांच्या सहभागातून ३ ते ९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात येणाऱ्या या महोत्सवात ‘पत्रास कारण की...’ या कार्यक्रमाचे सादरीकरण अभिनेते सागर कारंडे, उर्मिला कानेटकर, प्रसाद बेडेकर आणि मनोज डाळींबकर या मान्यवर कलाकारांनी केले. याप्रसंगी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विशेष अधिकारी तथा मराठी समन्वय अधिकारी किरण गायकवाड, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्यासह महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रपेटी, गावातील कट्टा आणि पोस्टमनची सायकल या साध्या पण अर्थपूर्ण नेपथ्याने कार्यक्रमाचे भावविश्व अधिक जिवंत केले. प्रत्येक पत्रासोबत प्रेक्षागृहात कधी शांतता पसरली, तर कधी टाळ्यांचा गजर झाला. या कार्यक्रमात वाचण्यात आलेली पत्रे म्हणजे जणू काळाच्या पोटात दडलेले आयुष्याचे तुकडे होते. मुंबईत कामासाठी गेलेल्या मुलीने आपल्या गावाकडील आईला लिहिलेल्या पत्रात शहरातील महिलांच्या समस्या मांडल्या; त्या शब्दांनी स्त्रीजीवनाची अस्वस्थ वेदना थेट रसिकांपर्यंत पोहोचली. एका मुलीने आपल्या वडिलांना लिहिलेल्या पत्रातून हुंडाविरोधी ठाम भूमिका आणि स्त्रीस्वातंत्र्याचा आवाज उमटला. ‘प्रिय विद्यार्थी मित्रांनो’ या पत्रातून एका शिपायाने विद्यार्थ्यांना दिलेले जीवनमूल्यांचे धडे टाळ्यांचा वर्षाव करून गेले. ‘समस्त मनुष्यप्राण्यांनो’ या पत्रात भुताच्या नजरेतून माणसाचे दर्शन घडले. ‘प्रिय किशोरकुमार’ या पत्राने एका चाहत्याच्या हृदयातील कृतज्ञता शब्दांत साकारली, ‘प्रिय सोशल मीडिया’ या पत्राने आधुनिक काळातील संवादहीनतेचा आरसा दाखवला, तर ‘प्रिय शोषित स्त्रियांनो’ या पत्रात एका पुरुषाने मनापासून माफी मागत स्त्रीवेदनेला शब्द दिले. ‘प्रिय सचिन’ या पत्राने क्रिकेटप्रेम आणि भावना दोन्हींचा संगम घडवला, तर ‘ती सध्या काय करतेय’ या पत्राने हरवलेल्या आठवणींचे कोमल स्मरण करून कार्यक्रमाला हळवी सांगता दिली.
आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, आकुर्डी प्राधिकरण येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृह, भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह आणि पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर अशा विविध ठिकाणी हे कार्यक्रम होत असून सर्वांना प्रवेश विनामूल्य आहे. मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे.
— किरण गायकवाड, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

