त्रिवेणी नगर चौकातील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी; गुंडगिरीमुळे नागरिक त्रस्त
पिंपरी चिंचवड, दि. ०८ : त्रिवेणी नगर मुख्य चौक परिसरात टपरीधारकांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून व्यवसाय सुरू केला आहे. या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, काही गावगुंड प्रवृत्तीचे व्यक्ती टपरीधारकांकडून रस्त्यावर व्यवसाय करण्यासाठी दरमहा "हप्ता" वसूल करत असून, त्यामुळे या भागात गुंडगिरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
त्रिवेणी नगर सिग्नल परिसरात चारही बाजूंनी टपऱ्यांनी व्यापल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. नागरिक आणि वाहनचालक यांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
या संदर्भात क्षेत्रीय अधिकारी व आयुक्त यांना लेखी तक्रार देण्यात आली असून, तात्काळ कारवाई करून अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.
"अधिकाऱ्यांनी त्वरित कठोर कारवाई करून हा बकालपणा थांबवावा, जेणेकरून नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण मिळेल," अशी अपेक्षा सचिन काळभोर, भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता, पिंपरी चिंचवड शहर यांनी व्यक्त केली आहे.

