राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा काढण्यात आली आहे. शरद पवार यांच्यासह 40 जणांची सुरक्षा काढण्यात आली आहे. 20 जानेवारी पासून सुरक्षा रक्षक काढले आहे. सुरक्षा रक्षक कमी करण्याबाबत अधिकृत माहिती केंद्रीय गृहखात्याने दिलेली नाही.
तसेच राज्यात शरद पवार यांना Z security आहे. पवारांच्या घरात गस्त घालणारे दिल्ली पोलिसांचे तीन आणि सीआरपीएफचे तीन जवान हटवण्यात आले आहेत. पवार यांच्या दिल्लीतील घरी सहा जनपथला तीन गार्ड होते. जे शिफ्ट मध्ये काम करत होते आणि एक PSO हा देखील होता. विशेष म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता मोदी सरकारकडून सुरक्षेत कपात केल्याची माहिती आहे.
याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकार सुडबुद्धीने कसं वागतंय, लोकशाही मानत नाही, सुरक्षा व्यवस्था काढली म्हणून शरद पवार घराबाहेर पडणार नाहीत का? महाराष्ट्राच्या मनात भाजपाबाबत जो राग होता तो आणखी वाढण्यास मदत होईल अशा शब्दात आव्हाडांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, यापूर्वीदेखील काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, त्या पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची एसपीजी सुरक्षा केंद्र सरकारने काढून घेतली असून त्यांना आता झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. यावरुन काँग्रेस नेत्यांनी मोदी सरकारवर टीका केली होती.

