महाराष्ट्र आणि केरळ राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर चेक पोस्ट सुरु करण्यात आले आहेत.
सागंली : महाराष्ट्र आणि केरळ राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन (Karnataka Government Posted Check Post On Border) कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर चेक पोस्ट सुरु करण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या कागवाड या ठिकाणी कर्नाटक सरकारकडून कोरोना चेक पोस्ट सुरु झाला आहे. तपासणी करुनचं महाराष्ट्रातील प्रवाशांना कर्नाटकमध्ये प्रवेश देण्यात येत आहे.
महाराष्ट्र सीमेवर कर्नाटक सरकारकडून चेक पोस्ट
महाराष्ट्र आणि केरळ राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याची धास्ती कर्नाटक सरकारने घेतली आहे. कर्नाटक सरकारने आता त्यांच्या राज्यात बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घातले आहेत. यासाठी महाराष्ट्र सीमेवर कर्नाटक सरकारकडून चेक पोस्ट उभे करण्यात आलेले आहेत. सांगली जिल्हा लगतच्या कर्नाटक राज्याच्या सीमेवर असणाऱ्या कागवाड या ठिकाणी कर्नाटक सरकारकडून चेक पोस्ट उभारण्यात आला आहे.
त्यामुळे सांगली जिल्ह्यातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरु झालेली आहे. या चेकपोस्टवर प्रवाशांची थर्मल स्कॅनिंग आणि मास्क तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर कोरोना टेस्टची विचारणा करण्यात येत आहे. त्याचबरोबर कोरोना नियम पाळण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत. पोलीस आणि आरोग्य प्रशासनाकडून प्रत्येक वाहनांची तपासणी करुनच कर्नाटकमध्ये प्रवेश देण्यात येत आहे.
महाराष्ट्र, केरळासह सहा राज्यांत सर्वाधिक कोरोना रुग्ण
महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि मध्य प्रदेशात कोरोनाचे रुग्ण आढळल्याचं दिसून आलं आहे. या राज्यांमध्ये वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून या सहाही राज्यांमध्ये 86.69 टक्के नव्या केसेस समोर आल्या आहेत. त्यात महाराष्ट्र आणि केरळात एकूण 75. 87 टक्के सक्रिय रुग्ण असल्याचं दिसून आलं आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, देशात कोरोनाचा दर 97.27 टक्के असून मृत्यू दर 1.42 टक्के आहे. देशात 1 लाख 43 हजाराहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत

