व्हायचं होतं डॉन, पण एन्काऊंटरच्या भीतीने पोलिसांपुढे लोटांगण, अट्टल गुन्हेगाराला फिल्मी स्टाईलने बेड्या

0 झुंजार झेप न्युज

संजयवर आत्तापर्यंत खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी असे 9 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 

अंबरनाथ : त्याला मुंबईचा डॉन व्हायचं होतं. त्यादृष्टीने त्याची वाटचालही सुरू होती, पण अचानक पोलिसांना तो घरी येणार असल्याची माहिती मिळते. अन् पोलीस फिल्मी स्टाईलने त्याला बेड्या ठोकतात. पण तो मात्र आपला एन्काऊंटर होईल, या भीतीनं पोलिसांपुढे अक्षरशः लोटांगण घालतो. एखाद्या चित्रपटात शोभावा, असा हा प्रकार अंबरनाथमध्ये घडला आहे. 

चंद्रशेखर बिराजदार उर्फ संजय पाटील असे या अट्टल गुन्हेगाराचं नाव आहे. हा अंबरनाथच्या सोमेश्वर मंदिर परिसरात दादागिरी करुन नंतर डॉन होण्याची स्वप्न पाहू लागला होता. संजयवर आत्तापर्यंत खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी असे 9 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

सातत्याने पोलिसांना गुंगारा

गेल्यावर्षी 9 सप्टेंबरला संजय पाटील त्याच्याच परिसरात घर बांधत असलेल्या एका रहिवाशाला धमकावले होते. माझ्या परवानगीशिवाय बांधकाम कसं केलं? असं विचारत त्याने मारहाण केली होती. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र डॉन होण्याची स्वप्न पाहत असलेला संजय सातत्याने पोलिसांना गुंगारा देत होता.

अखेर 24 फेब्रुवारीला तो त्याच्या घराच्या परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. मात्र दोनदा पोलिसांचा सापळा चुकला. अखेर तिसऱ्या प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील यांनी संजयला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो बाईकवरून पळून जाऊ लागला. पण रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पोलिसांनी सापळा रचलेला असल्यानं तो पोलिसांच्या हाती लागला.

एन्काऊंटर करतील या भीतीने पोलिसांच्या पाया पडला

पोलिसांनी अक्षरशः फिल्मी स्टाईलने पाठलाग करत त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्यावर झडप घालून त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे परदेशी बनावटीची पिस्तूल आणि चार गोळ्या पोलिसांना आढळून आल्या. यावेळी डॉन होण्याची स्वप्न पाहणारा संजय पोलीस आपला एन्काउंटर करतील, या भीतीने अक्षरशः पोलिसांच्या पाया पडला.

तब्बल वर्षभरापासून त्याच्या मागावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील यांनी त्याला पोलीस ठाण्यात आणलं. त्याला अटक करून कोर्टात सादर करण्यात आलं. संजय पाटील यांच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. तसेच अंबरनाथ शहरातही त्याने अनेकांना धमक्या दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र तो मोकाट फिरत असल्यानं त्याच्या भीतीने अद्याप कुणीही पोलिसांकडे तक्रार दिली नव्हती. मात्र आता त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने ज्यांना ज्यांना त्रास दिला असेल, त्यांनी समोर येऊन न घाबरता तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केलं आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.