• प्रशिक्षणात पूर प्रवण गावांनी सहभाग नोंदवावा
सांगली, दि. 22,: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने मिरज, पलूस, वाळवा व शिराळा तालुक्यातील एकूण 104 पूर प्रवण गावातील गाव आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दलास आपत्ती व्यवस्थापनाबाबत ऑनलाईन प्रशिक्षण दि. 24 व 25 जून 2021 रोजी आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण व्हाईट आर्मी कोल्हापूर व रॉयल बोट क्लब सांगली यांच्याकडील तज्ज्ञ व्यक्ती देणार असून या प्रशिक्षणात पूर प्रवण गावांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
या प्रशिक्षणामध्ये आपत्कालीन साहित्याची माहिती (बोट, इंजिन, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग), प्रथमोपचार, शोध व सुटका कार्यपध्दती इत्यादी बाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दि. 24 जून रोजी सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत मिरज तालुक्यातील 20 गावातील व दुपारी 3 ते 4.30 या वेळेत पलूस तालुक्यातील 25 गावातील प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर दि. 25 जून रोजी सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत वाळवा तालुक्यातील 38 गावातील व दुपारी 3 ते 4.30 या वेळेत शिराळा तालुक्यातील 21 गावातील प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.
प्रशिक्षणाची लिंक https://mh.dit.webex.com/meet/collector.sangli असून सर्व प्रशिक्षणार्थींनी उपस्थित ठिकाणाहून प्रशिक्षण घ्यावे. प्रशिक्षणाकरिता प्रशिक्षणार्थींनी वरील नमूद वेळेपेक्षा 10 मिनिटे अगोदर लॉगइन करावे जेणेकरून प्रशिक्षण वेळेत सुरू होण्यास मदत होईल. पूर प्रवण गावातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच इत्यादी गावस्तरावरील अधिकारी व पदाधिकारी यांना प्रशिक्षणाकरिता निमंत्रित करून ते उपस्थित राहतील याची खात्री करावी. प्रशिक्षणाकरिता तालुका स्तरावरील निवासी नायब तहसिलदार व गाव स्तरावर नोडल अधिकारी म्हणून तलाठी यांची नियुक्ती करावी. प्रशिक्षणाची लिंक प्रत्येक प्रशिक्षणार्थीस व्हॉटस ॲप व्दारे नोडल अधिकारी यांच्या माध्यमातून पाठवावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी संबंधित तहसिलदार यांना दिले आहेत.

