पालक गमावलेल्या बालकांच्या शिक्षणासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

0 झुंजार झेप न्युज

पालक गमावलेल्या बालकांच्या शिक्षणासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

सोलापूर,दि.2 ऑगस्ट : कोविड संसर्गामुळे जिल्ह्यातील पालक गमावलेल्या बालकांचे सर्व्हेक्षण झाले आहे. त्यांच्या शिक्षणासाठी जिल्ह्यातील सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत श्री.शंभरकर यांनी आवाहन केले. बैठकीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा न्यायाधीश शशिकांत मोकाशी, बालकल्याण समितीच्या अध्यक्ष अनुजा कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक सूर्यकांत पाटील, सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मोहन शेगर, महिला व बालविकास अधिकारी डॉ. विजय खोमणे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे आदी उपस्थित होते.   

श्री. शंभरकर म्हणाले, कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांच्या शिक्षणाची सोय शासकीय शाळेमध्ये होत आहे. मात्र खाजगी शाळेत प्रवेश घेतला तर फीसाठी अडवणूक होऊ नये. फी भरणे शक्य नसलेल्या बालकांना सामाजिक संस्थांनी (एनजीओ) पुढाकार घेऊन आधार द्यावा. यासाठी बालकांनी शिक्षण विभागाशी संपर्क करावा. कोविडमुळे विधवा झालेल्या 202 महिलांना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, संजय गांधी निराधार पेंशन योजनामधून लाभासाठी तहसील कार्यालयाशी संपर्क करावा. त्यांनाही प्रशासनाने त्वरित लाभ मिळवून द्यावा. 

पालक गमावलेल्या बालकांच्या वारस मालमत्ता, बँक प्रकरणे, कर्ज आणि ठेवी यांची माहिती गृहभेटी देऊन घ्या. मुलांना किंवा त्यांचा सांभाळ करणाऱ्या कुटुंबाला काही अडचणी आहेत का जाणून घ्या. पुढच्या आठवड्यापर्यंत सर्व बालकांना बालसंगोपन लाभ मंजूर करावा, यासाठी निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा. बालकांची आरोग्य तपासणी, त्यांचे लसीकरण यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग किंवा सिव्हील हॉस्पिटलशी संपर्क करण्याचे आवाहनही श्री. शंभरकर यांनी केले. 

श्री. मोकाशी यांनी सांगितले की, पालक गमावलेल्या बालकांना मालमत्ता, बँकेत खाते उघडण्यासाठी न्यायालयातून कायदेशीर वारस नेमून घ्यावा लागेल, यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मदत करेल. 

जिल्ह्यात कोविडमुळे आई किंवा वडील गमावलेले बालक आजअखेर 697 असून यापैकी 74 माता तर 623 पित्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोविड-19 मुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यामुळे अनाथ झालेली 32 बालके आहेत. अनाथ बालकांना बालसंगोपनाचा लाभ देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत 374 बालकांना लाभ मंजूर झाला असून उर्वरित बालकांच्या गृहचौकशीचा अहवाल पूर्ण झाल्याची माहिती डॉ. खोमणे यांनी दिली. 

बालकांच्या समस्यांबाबत संपर्क क्रमांक

चाईल्ड हेल्पलाइन 1098, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, नियंत्रण कक्ष ०२१७- २७३२०००, २७३२०१०, अनुजा कुलकर्णी, अध्यक्ष बालकल्याण समिती ९४२३३३०४०१, विजय खोमणे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ८६०५४५३७९३, आनंद ढेपे ९८८१४९०२२६, दीपक धायगुडे ७३८७२६७९२२, जयाप्रदा शरणार्थी ७९७२५५०४२३, शोभा शेंडगे ९६८९९५८६४५

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.