डागा स्त्री रुग्णालयातील डे केयर सेंटरमध्ये 10 हजाराहून अधिक सिकलसेलग्रस्तांना समुपदेशन व औषधोपचार

0 झुंजार झेप न्युज

डागा स्त्री रुग्णालयातील डे केयर सेंटरमध्ये 10 हजाराहून अधिक सिकलसेलग्रस्तांना समुपदेशन व औषधोपचार

नागपूर,दि.30 : डागा स्त्री रुग्णालयातील डे केयर सेंटरद्वारे 10 हजाराहून अधिक सिकलसेलग्रस्तांना एप्रिल ते ऑगस्ट 2021 दरम्यान समुपदेशन करण्यात करण्यात आले, तर 542 रुग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात आले. 65 रुग्णांना राज्य रक्त संक्रमण परिषदेचे (एसबीटीसी)चे ओळखपत्र देण्यात आले.

सिकलसेल या दुर्मिळ आजारावर राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो. डागा शासकीय स्त्री रुग्णालयात डे केयर सेंटर रुग्णांचा उपचारासाठी कार्यरत असून या सेंटर मार्फत वाहक व रुग्ण विवाहपूर्व, नियमित उपचार, कुटुंब नियोजन व घ्यावयाची काळजी या बाबत समुपदेशन व औषधोपचार केला जातो. डागा रुग्णालयामध्ये डॉ. विनिता जैन यांच्यासह 2 समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत.

या सेंटरद्वारे 2011 ते 2020 पर्यंत 2 लक्ष 45 हजार 483 रुग्णांचे समुपदेशन करण्यात आले, तर 12 हजार 317 रुग्णांवर उपचार करण्यात आले.तर 1436 एसबीटीसीचे कार्ड देण्यात आले.

अत्यंत दुर्धर व अनुवांशिक आजार म्हणून ओळख असणाऱ्या सिकलसेलग्रस्त रुग्णांना नियमित रक्ताची आवश्यकता भासते. त्यांना वेळोवेळी रक्त द्यावे लागते. रक्ताचे प्रमाण कमी राहत असल्याने रुग्ण वारंवार आजारी पडतो. या गंभीर आजाराविषयी लोकांमध्ये जागृती व्हावी, यासाठी 11 डिसेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान नियंत्रण सप्ताह राबविण्यात येतो.

सिकलसेल हा आजार गर्भधारणेच्या वेळी जेनेटीक बदलामुळे होतो. तसेच रक्तदोषामुळे उद्भवणारा दुर्धर आजार असून जन्मापासून मनुष्याच्या अंतापर्यंत सोबत राहतो. रक्तात लाल व पांढऱ्या अशा दोन प्रकारच्या पेशी असतात. सर्वसाधारण व्यक्तीच्या शरीरात लाल रक्तपेशींचा आकार गोल असतो. परंतु सिकलसेल रुग्णात पेशीचा आकार ऑक्सिजन पुरवठ्याअभावी विळ्यासारखा होतो. आई आणि वडील दोघेही सिकलसेलग्रस्त किंवा वाहक असल्यास त्यांच्या अपत्यांना हा आजार होतो. याबाबतीत डागा रूगणालयांतील सेंटरद्वारे अशा व्यक्तीचे समुपदेशन केले जाते.

तसेच गर्भजल परीक्षण (सीव्हीएस) करीता समुपदेशन केले जाते. डे केयर सेंटरद्वारा गंभीर स्वरुपाच्या रुग्णांना हायड्रॉक्सी युरीया या विशेष औषधाची मोफत सोय केले जाते. डे केयर सेंटर अंतर्गत सिकलसेल रुग्णांचा रक्त संक्रमणाकरीता महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद (एसबीटीसी)चे ओळखपत्र बनविण्यात येतात.

सिकलसेल रुग्णांना करण्यात येणारी मदत

  राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत कार्यक्रमातंर्गत रुग्णांची तपासणी करून तपासणी अंती सिकलसेल रुग्णांना औषधोपचार पुरविण्यात येतो. व मोफत रक्त पुरवठा करण्यात येतो. सिकलसेल हा आजारसुध्दा थॅलेसिमीया अथवा हिमोफिलीया सारखाच रक्तदोष आजार असल्यामुळे जिल्ह्यातील सिकलसेलग्रस्त रुग्णांना सर्व शासकीय, निमशासकीय रुग्णालयातून आवश्यकतेनूसार मोफत रक्त पुरवठा व औषेधोपचार करण्यात येतो. मोफत रक्त पुरवठा करण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदमार्फत 104 हा मोफत रक्तपुरवठा टोल फ्री नंबर असून प्रत्येक सिकलसेल, थायलेसिमीया रुगणांकरीता मोफत रक्त पुरवठा करण्यात येतो. 5 डिसेंबर 2001 या शासन निर्णयानुसार रुग्णांची देखभाल करण्यात येते.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 26 ऑक्टोबर 2010 च्या शासन निर्णयानुसार सिकलसेल रुग्णांना मासिक रुपये 1000/- याप्रमाणे जिल्ह्यातील पात्र रूग्णांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात येत आहे. तसेच सिकलसेल रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया व उपचाराची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

10 मार्च 2015 च्या शासननिर्णयानूसार उपचारादरम्यापन सिकलसेल रुग्ण व त्याच्या एका मदतनिसास मोफत एस.टी प्रवास सवलत सुविधा देण्यात येतात. 5 डिसेंबर 2001 नुसार सिकलसेल रुग्णांना मोफत रक्त संक्रमण व औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.