पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार आज शेखर सिंह यांनी स्विकारला

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार आज शेखर सिंह यांनी स्विकारला

पिंपरी चिंचवड,दि.18: नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन शहरातील पायाभूत सुविधांची निर्मिती आणि संरचनात्मक आखणी करून शहराच्या नावलौकिकात वाढ करण्यासाठी भर दिला जाणार असून वेगाने वाढणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार आज शेखर सिंह यांनी स्विकारला. त्यांनतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये पदभार स्विकारण्याची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप यांनी नवनियुक्त आयुक्त शेखर सिंह यांचे स्वागत केले. यावेळी सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

२०१२ च्या आयएएस बॅचच्या महाराष्ट्र केडरचे अधिकारी असणारे शेखर सिंह एम.एस.स्ट्रक्चर इंजिनियर आहेत. २०१२ मध्ये परिविक्षाधीन कालावधीमध्ये त्यांनी रामटेक नागपूर येथून प्रशासकीय सेवेला सुरुवात केली. त्यानंतर सहायक जिल्हाधिकारी म्हणून ते ऑगस्ट २०१३ पासून नागपूर येथे कार्यरत होते. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी जून २०१५ पासून काम करण्यास सुरुवात केली. जानेवारी २०१८ मध्ये ते गडचिरोलीचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले. तर जानेवारी २०२० पासून ते सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. आज त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. प्रारंभी,आयुक्त शेखर सिंह यांनी सर्व विभागप्रमुखांशी औपचारिक संवाद साधत परिचय करून घेतला. प्रामाणिकपणा, कामाप्रती एकनिष्ठता आणि कर्तव्यनिष्ठता महत्वाची असून अधिकाऱ्यांनी नागरिकांशी सौजन्याने वागत आपली सेवा बजवावी अशी सूचना देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.