पुणे महापालिकेची मोठी कारवाई: लोहगाव–खराडी परिसरातील १०,००० चौ.फुट अनधिकृत बांधकामे हटवली
पुणे, दि. १७ मार्च २०२६ : पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण/अनाधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने आज पहाटे मोठी कारवाई करत नगररोडवरील लोहगाव आणि खराडी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवला. सकाळी ६ वाजता सुरू झालेल्या या मोहिमेत सुमारे १०,००० चौरस फूट क्षेत्रातील कच्ची व पक्की बांधकामे हटवण्यात आली.
ही कारवाई महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार उपआयुक्त सोमनाथ बनकर, मुख्य सुरक्षा अधिकारी डॉ. रमेश शेलार आणि सहाय्यक आयुक्त प्रकाश वालगुडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. बांधकाम विकास विभागाचे कनिष्ठ अभियंता सौरभ खरात यांचीही उपस्थिती होती.
कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात महापालिका पोलिसांचे २० कर्मचारी, एमएसएफचे ५० जवान, तसेच ६ जेसीबी, २ गॅस कटर आणि ४ ब्रेकर यांचा वापर करण्यात आला. याशिवाय ६ सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक आणि २० बिगारी सेवक यांचा सहभाग होता.
महापालिकेने स्पष्ट केले आहे की, शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात अशी कारवाई पुढेही सुरू राहणार असून नागरिकांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कठोर पावले उचलली जातील.

.jpeg)