त्रिवेणी नगर सिग्नल परिसरातील बेकायदा मंडपामुळे वाहतूक कोंडीचा आरोप; कारवाईची मागणी
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : प्रभाग क्रमांक १२ मधील भक्ती-शक्ती चौक ते स्पाईन रोड या मार्गावरील त्रिवेणी नगर सिग्नल परिसरात रस्त्यावर परवानगीशिवाय मंडप उभारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मंडपामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
या संदर्भात नागरिकांच्या वतीने सारथी हेल्पलाईनवर तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. मुख्य चौकात उभारण्यात आलेल्या या मंडपामुळे वाहनचालकांना अडथळा निर्माण होत असल्याने वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, त्रिवेणी नगर सिग्नल परिसरातील सिग्नल यंत्रणाही प्रभावीपणे कार्यरत नसल्यामुळे वाहतुकीची समस्या अधिक गंभीर होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाची पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन आणि चिखली वाहतूक पोलिसांनी तातडीने दखल घेऊन मंडपाला आवश्यक परवानगी आहे की नाही, याची तपासणी करावी. तसेच नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.
वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत बांधकामे अथवा मंडपांवर प्रशासनाने तातडीने कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही काळभोर यांनी केली आहे.

