पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘स्वागतम ई-प्रवेश प्रणाली’ला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद; ५१ हजार १५९ अपॉइंटमेंट्सची नोंद

0 झुंजार झेप न्युज

१४ हजार ७२३ नागरिकांनी तयार केली खाती; ३९ हजार ४४३ नागरिकांनी घेतला आगाऊ नोंदणीचा लाभ 

पिंपरी चिंचवड,दि.11 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत येणाऱ्या नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारी सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापालिकेने १ मे २०२६ पासून ‘स्वागतम ई-प्रवेश’ ही ऑनलाइन नोंदणी प्रणाली सुरू केली आहे. या डिजिटल सुविधेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, १ मे २०२६ ते ७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत तब्बल ५१ हजार १५९ अपॉइंटमेंट्सची नोंद झाली आहे. यापैकी ३९ हजार ४४३ नागरिकांनी आगाऊ ऑनलाइन नोंदणी करून महापालिका मुख्य इमारतीस भेट दिली आहे. तसेच आतापर्यंत १४ हजार ७२३ नागरिकांनी या प्रणालीवर आपली लॉगिन खाती तयार केली आहेत. 

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत विविध विभागांमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, अनावश्यक प्रतीक्षा टाळता यावी आणि नागरिकांच्या भेटीची अचूक डिजिटल नोंद उपलब्ध राहावी, या उद्देशाने ‘महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत विविध विभागांमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, अनावश्यक प्रतीक्षा टाळता यावी आणि नागरिकांच्या भेटीची अचूक डिजिटल नोंद उपलब्ध राहावी, या उद्देशाने ‘स्वागतम ई-प्रवेश’ प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना घरबसल्या आपल्या भेटीची ऑनलाइन नोंदणी करता येत असून, संबंधित विभागाची निवड करून निश्चित दिवशी महापालिका मुख्य इमारतीत प्रवेश घेता येतो. 

सर्वाधिक भेटी दिलेले विभाग 

‘स्वागतम ई-प्रवेश’ प्रणाली सुरू झाल्यापासून नागरिकांनी विविध विभागांना भेटी देण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. यामध्ये सर्वाधिक नागरिकांनी भेट दिलेल्या पहिल्या दहा विभागांमध्ये बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागास ९ हजार ३६१, नगररचना विभागास ४ हजार ३११, स्थापत्य विभागास ३ हजार ७९२, महापौर कार्यालयास २ हजार ३०६, वैद्यकीय विभागास २ हजार ४०३, आरोग्य विभागास १ हजार ९२०, पर्यावरण अभियांत्रिकी विभागास १ हजार ५७१, पाणीपुरवठा व जलनिस्सारण विभागास १ हजार ४९१, आयुक्त कार्यालयास १ हजार ३३० आणि लेखा विभागास १ हजार २४९ नागरिकांनी भेट दिली आहे. 

यावरून महापालिकेच्या विविध प्रशासकीय व नागरी सेवा विभागांमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांकडून डिजिटल प्रवेश व्यवस्थेचा प्रभावीपणे वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. 

संकेतस्थळावरून सहज नोंदणी 

‘स्वागतम ई-प्रवेश’ प्रणालीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘मुख्य इमारत प्रवेश प्रणाली’ या लिंकद्वारे ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रथमच नोंदणी करणाऱ्या नागरिकांनी आपले लॉगिन अकाऊंट तयार करावे लागते. त्यासाठी पूर्ण नाव, राहण्याचा पत्ता, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांकाची माहिती भरावी लागते. 

लॉगिन अकाऊंट तयार करण्याची प्रक्रिया केवळ एकदाच करावी लागते. त्यानंतर प्रत्येक वेळी नव्याने माहिती भरण्याची आवश्यकता नसून, नागरिक आपल्या लॉगिनद्वारे थेट प्रवेशासाठी नोंदणी करू शकतात. नोंदणी प्रक्रियेदरम्यान मोबाईल क्रमांकाची ओटीपीद्वारे पडताळणी केली जाते. तसेच महापालिका मुख्य इमारतीत प्रत्येक प्रवेशाच्या वेळीही ओटीपी प्रणालीचा वापर करण्यात येतो. नागरिकांना एका भेटीसाठी किमान एक आणि कमाल तीन विभागांची निवड करता येते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.