पिंपरी पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी; ५० हजारांचा दंड
पिंपरी चिंचवड,दि.21: पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सन २०१९ मधील एका गंभीर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पिंपरी-चिंचवड जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. तसेच न्यायालयाने आरोपीला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, दंडाची रक्कम न भरल्यास एक वर्षाची अतिरिक्त सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ८९४/२०१९ अन्वये भारतीय दंड विधान कलम ३७६ तसेच POCSO Act मधील कलम ३, ४, ५ आणि ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. POCSO कायद्यात कलम ३ मध्ये penetrative sexual assault, तर कलम ५ मध्ये aggravated penetrative sexual assaultची तरतूद आहे; त्यासाठी अनुक्रमे कलम ४ आणि ६ मध्ये शिक्षेची तरतूद आहे.
या प्रकरणातील आरोपी हेमंत कृष्णा तांडेल (वय ३५) याच्याविरुद्ध खटला चालविण्यात आला. पिंपरी-चिंचवड जिल्हा सत्र न्यायालयातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांच्या न्यायालयात २१ सप्टेंबर २०२६ रोजी या प्रकरणाचा निकाल देण्यात आला.
प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांनी केला. न्यायालयीन कामकाजासाठी विशेष सरकारी अभियोक्ता स्मिता मुकुंद चौगुले यांनी सरकारच्या वतीने बाजू मांडली.
पिंपरी पोलीस ठाण्याच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय कुमार शिंदे, कोर्ट पैरवी अधिकारी GPSI दीपक गायकवाड, तसेच कोर्ट ड्युटी अंमलदार ASI राजेंद्र उंबरे आणि पोलीस कॉन्स्टेबल इसाक शेख यांच्या भूमिकेचीही पोलिसांनी नोंद केली आहे.

