अहमदनगर: अहमदनगर शहरातील धोकादायक रेल्वे उड्डाणपुलावर गुरुवारी रात्री ट्रक आणि एसटी बसमध्ये झालेल्या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुलावरील तुटलेल्या कठड्यामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले असल्याचे समजते आहे.
अहमदनगरकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसची पुण्याहून अहमदनगरकडे येणाऱ्या ट्रकला समोरासमोर धडक बसली. या अपघातात एसटी बसमधील ३ प्रवासी हे जागीच मृत पावले. तर या गंभीर अपघातात २० ते २५ प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमींना तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
गुरुवारी रात्री झालेल्या अपघातात अरुंद असलेल्या धोकादायक उड्डाणपुलाचे कठडे तुटलेले असल्याने अपघातग्रस्त एसटी बस ही अर्धी पुलावर तर आर्धी हवेत लोंबकळत होती.
एस.टी बस ही तुटलेल्या कठडेच्या बाहेर जाऊन अर्धवट परिस्थिती लोंबकळत असल्याने बस पुलाखाली पडण्याच्या भीतीने बस मधील प्रवाश्यांनी बस बाहेर उड्या घेतल्या मात्र प्रवासी थेट पुलाखाली पडल्याने गंभीर जखमी झाले. दरम्यान सर्व जखमी प्रवाशांना नागरिकांच्या मदतीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
अहमदनगर-पुणे महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाने आता पन्नाशी गाठली आहे, जुन्या पद्धतीचे बांधकाम असलेल्या या पुलावरून मोठी वर्दळ सुरु असते. नगर-पुणे रस्ता हा पूर्वी दुहेरी असताना हा पूल बांधण्यात आला होता. मात्र आता हा रस्ता चौपदरी झाल्याने वाहतूक वाढली असून या पुलावरून अवजड वाहतूकही सुरू झाली आहे. पण जीर्ण झालेल्या या धोकादायक उड्डाणपुलाच्या दुरुस्तीकडे अद्यापही प्रशासनाने लक्ष दिलेलं नाही. मात्र, आता या भीषण अपघातानंतर प्रशासन आता तरी या पुलाच्या बांधकामाकडे लक्ष देणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
रेल्वे उड्डाणपुलावरील झालेला हा अपघातात अत्यंत भीषण होता. यात तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले. पण सुदैवाने इतर अनेक प्रवाशांचे प्राण वाचले. मात्र, आता या तुटलेल्या कठड्याच्या धोकादायक पुलाचं मजबुतीकरण करणं गरजेचं बनलं आहे.
रेल्वे उड्डाणपुलावरील झालेला हा अपघातात अत्यंत भीषण होता. यात तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले. पण सुदैवाने इतर अनेक प्रवाशांचे प्राण वाचले. मात्र, आता या तुटलेल्या कठड्याच्या धोकादायक पुलाचं मजबुतीकरण करणं गरजेचं बनलं आहे.

