मुंबई : येत्या सोमवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद आणि चांगली खाती मिळावीत, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मांडली. उपमुख्यमंत्रिपद मिळावे ही पक्षाची मागणी असल्याचे संकेत त्यांनी दिले.
सरकारमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक पक्षाला चांगल्या खात्यांची अपेक्षा असते. ही अपेक्षा करणेही चूक नाही. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना चांगली खाती मिळावीत, असे वाटते. आगामी विस्तारासाठी काँग्रेसच्या मंत्र्यांची नावे निश्चित केली आहेत. काँग्रेसमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला, असा टोला राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी हाणला असला तरी हा दावा थोरात यांनी पत्रकार परिषदेत फेटाळला.
शरद पवार यांच्याकडे महाविकास आघाडीचा 'रिमोट' असल्याची चर्चा होते याकडे लक्ष वेधले असता, आघाडी सरकारमध्ये प्रत्येक पक्षाला आपली मते मांडण्याचा अधिकार असतो, असे सांगत पवारांचा कोणताही रिमोट नसल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्रिमंडळाचा विस्तार प्रशासनाच्या विनंतीमुळेच पुढे ढकलावा लागला. गेल्या शनिवारी नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपले. अधिकारी रविवारी मध्यरात्री किंवा सोमवारी मुंबईत पोहोचले. शपथविधीची तयारी करण्यास किमान ४८ तास तरी लागतात. या साऱ्या अडचणी लक्षात घेऊनच विस्तार लांबणीवर टाकण्यात आल्याचे थोरात यांनी सांगितले.

