पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात घरफोड्या करुन धुमाकूळ घालणाऱ्या 14-12 के आर गॅंगच्या पिंपरी चिंचवड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात घरफोड्या करुन धुमाकूळ घालणाऱ्या 14-12 के आर गॅंगच्या पिंपरी चिंचवड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 14-12 के आर गॅंग कर्नाटक राज्यात पळून जाण्याचा प्रयत्नात होती. त्यावेळी पोलिसांनी के आर गॅंगला अटक केली आहे.
के आर गँगचा म्होरक्या किरण राठोड तसेच के आर गॅंगचे सदस्य भगतसिंग भादा, करण राठोड आणि अभिषेक नलावडे यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. किरण राठोडने आपल्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून स्वतःच्या टोळीला के आर गॅंग असं नाव दिलं होतं. तसेच पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात आपल्या गँगची दहशत निर्माण व्हावी म्हणून के आर गँगने स्वतःच्या गॅंगला पिंपरी चिंचवडचा RTO पासिंग नंबर 14-12 के आर गॅंग असं नाव दिलं.
के आर गॅंग कडून भोसरी पोलिसांनी 9 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले असून, 80 ग्रॅम सोन्याचे दागिने, 11 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 4 लाख 29 हजार 125 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे

