उस्मानाबादेत ट्रक उलटला, 70 लाखांचे एलईडी, मोबाईल गावकऱ्यांनी पळवल्याचा दावा

0 झुंजार झेप न्युज

सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सोलापूर-औरंगाबाद हायवेवर उस्मानाबादजवळ हा अपघात झाला होता.

उस्मानाबाद : ‘फुकट तिथे चिकट’ ही प्रवृत्ती सर्रासपणे पाहायला मिळते. अपघातानंतर मदतीला धावून जाणारे हात कमी, आणि त्यांना लुबाडणारे हात जास्त असल्याचं चित्र हल्ली अनेक वेळा पाहायला मिळतं. माल वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला, तर मदतीऐवजी लूट होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. नुकताच उस्मानाबादमध्ये ट्रक उलटून अपघात झाला. या ट्रकमधील मोबाईल फोन, एलईडी टीव्ही अशा 70 लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रिक उपकरणांची लूट झाल्याचा दावा केला जात आहे.

70 लाखांची विद्युत उपकरणं चोरीला

कोंबड्यांपासून मद्यापर्यंत खाण्या-पिण्याच्या वस्तूंची वाहतूक करणाऱ्या ट्रकचे अपघात झाल्यानंतर त्यांची पळवापळवी होत असल्याचं आधीही अनेकदा दिसलं आहे. मात्र उस्मानाबाद ट्रक उलटल्यानंतर त्यातील इलेक्ट्रिक उपकरणांची लूट झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पादचारी आणि गावकऱ्यांनी तब्बल 70 लाख रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेल्याचा दावा केला जात आहे. ही उपकरणं परत मिळवण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली.

सोलापूर-औरंगाबाद हायवेवर ट्रक उलटला

सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सोलापूर-औरंगाबाद हायवेवर उस्मानाबादजवळ हा अपघात झाला होता. “ट्रकमध्ये मोबाईल फोन, कॉम्प्युटर, एलईडी टीव्ही, खेळणी अशी विद्युत उपकरणे होती. अपघातानंतर ती रस्त्यावर पडली, तेव्हा गावकऱ्यांची त्या वस्तू उचलण्यासाठी झुंबड उडाली. काही जणांनी कंटेनरचा दरवाजा उघडून वस्तू लांबवल्या. स्थानिक पोलीस आणि दंगल नियंत्रण पथकाला बोलवावं लागलं.” अशी माहिती ट्रक चालकाने दिली.

40 टक्के वस्तू परत मिळाल्या

पोलिसांच्या आवाहनानंतर काही जणांनी वस्तू परत केल्या. त्यानंतर उर्वरित वस्तू शोधण्यासाठी पोलीस गावात हिंडू लागले. 70 लाखांच्या वस्तू लुबाडल्याचा दावा केला जात असून त्यापैकी 40 टक्के वस्तू परत मिळाल्याची माहिती आहे. सर्च ऑपरेशन अजूनही सुरु असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी सांगितलं.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.