कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ तातडीने द्यावा- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

0 झुंजार झेप न्युज

कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ तातडीने द्यावा- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जळगाव,दि. 24 : कोविडमुळे दोन्ही पालक गमावल्याने अनाथ झालेल्या बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ मिळण्यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक ती कार्यवाही करुन त्यांना लाभ मिळवून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिलेत.

कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांची काळजी व संरक्षणासाठी गठीत कृती दलाची बैठक आज जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. ए ए के शेख, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, आरिफ शेख, वैजयंती तळेले, योगेश मुकावार, भानूदास येवलेकर आदि उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, पालक गमावल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी दरमहा 1100 रुपये शासनामार्फत बाल संगोपन योजनेद्वारे देण्यात येतात. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील पात्र बालकांना तातडीने मिळाला पाहिजे. या बालकांचे शिक्षण थांबता कामा नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्याचबरोबर या बालकांचे वारसाहक्क अबाधित राहतील यासाठी त्यांना आवश्यक असलेले वारस प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावे. या बालकांना शासनामार्फत मिळणारे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी त्यांचे बँक खाते उघडण्यासाठी बॅकांनी मदत करावी. त्याचबरोबर या बालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना आवश्यक ती मदत करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सर्व संबंधित विभागांना दिलेत. 

या बालकांना कायदेशीर मार्गदर्शन मिळण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल असे जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. शेख यांनी सांगितले. 

सध्या जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 13 असून एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या 403 इतकी आहेत. बाल संगोपन योजनेचे आदेश दिलेल्या बालकांची संख्या 62 असून 13 अनाथ बालकांचे आदेश पालकांना निर्गमित करण्यात आले आहेत. तर 184 विधवा महिलांची माहिती प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. परदेशी यांनी बैठकीत दिली. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.