ग क्षेत्रीय कार्यालय येथील मा. महापौर यांची नगरसदस्य / नगरसदस्या आणि अधिकारी यांचे समवेत बैठक.

0 झुंजार झेप न्युज

ग क्षेत्रीय कार्यालय येथील मा. महापौर यांची नगरसदस्य / नगरसदस्या आणि अधिकारी यांचे समवेत बैठक.

पिंपरी चिंचवड, दि.26 जुलै : शहरातील नागरीकांच्या आरोग्य आणि पाणीपुरवठा या मुलभूत प्रश्नांकडे अधिका-यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन त्या समस्या सोडवाव्यात असे आदेश महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आज दिले. 

थेरगाव येथील ग क्षेत्रिय कार्यालय येथे महापौर माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग अध्यक्ष, नगरसदस्य, नगरसदस्या तसेच स्थापत्य, विद्युत,पाणीपुरवठा, आरोग्य, वैद्यकीय, उद्यान आणि प्रशासन अधिका-यांसमवेत क्षेत्रिय कार्यालयांतर्गत समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी आदेश दिले. बैठकीपुर्वी दिवंगत नगरसदस्या अर्चना बारणे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

 या बैठकीस प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, क्षेत्रिय अधिकारी श्रीनिवास दांगट, नगरसदस्य संदीप वाघेरे, चंद्रकांत नखाते, अभिषेक बारणे, अॅड. सचिन भोसले, विनोद तापकीर, संदीप गाडे, गोपाळ मळेकर, नगरसदस्य झामाबाई बारणे, सविता खुळे, सुनिता तापकीर, ज्येष्ठ वैदयकीय अधिकारी डॉ. संगिता तिरूमणी, डॉ.अभयचंद्र दादेवार, संबंधित अधिकारी, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित नगरसदस्यांनी महापौर माई ढोरे यांचे समोर समस्या मांडल्या. त्यामध्ये प्रामुख्याने स्थापत्याची कामे संथगतीने सुरु आहेत. राडारोडा उचलला जात नाही. विद्युतचे जुने डीपी बदलणे, अतिक्रमणे वाढली आहेत याबाबतीत कार्यवाही होत नाही. डासांचे प्रमाण वाढले आहे. फवारणी करणे आवश्यक आहे. रस्त्यांवर झाडांच्या फांद्यांमुळे अडथळा निर्माण होतो. पाणी गढूळ आहे. आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कामांसाठी तरतूद कमी आहे. लसीकरण अपुरे आहे. लसीकरणाचे नियोजन व्यवस्थित नाही. पावसामुळे ड्रेनेज तुंबून पाणी येते. कनिष्ठ अभियंते बैठकीस उपस्थित राहत नाहीत. अधिका-यांमध्ये ताळमेळ दिसत नाही. नदीमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळत आहे. करसंकलन विभागाकडे ३-३ महिने फाइल्स प्रलंबित आहेत. वाकड रस्त्याचे काम अपूर्ण आहे. घरोघरी औषधांची फवारणी करणेत यावी. महानगरपालिकेने डांगे चौक ते ताथवडे येथील गाळेभाडे वाढविले आहे. सध्या कोरोनामुळे व्यवसाय कमी झाले ते कमी करण्यात यावे, आदी समस्याचा समावेश होता.

अतिरिक्त आयुक्त यांनी अधिका-यांना मार्गदर्शन करताना नवीन बदली होऊन आलेल्या अधिकारी, अभियंते यांनी वार्डातील कामे समजून घ्यावीत. कामे पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. परस्परांत समन्वय साधून विकासकामे पूर्ण करावीत. महापौरांच्या बैठकीचा उद्देश शहरातील समस्या सोडविण्याचा आहे. त्यामुळे सर्वच अधिका-यांनी दक्षता घेऊन काम करावे असे सांगितले.

महापौर माई ढोरे म्हणाल्या नगरसदस्यांच्या समस्या आठ दिवसांत सोडवाव्यात. सर्व कामे वेळेवर करावीत. अधिका-यांनी कामाचे नियोजन करून सदस्यांना वेळोवेळी अवगत करावे. पाणीप्रश्नाबाबत पाण्याचा दाब व्यवस्थित राहील याकडे लक्ष द्यावे. असे सांगून नागरीकांचा जीव महत्त्वाचा असल्याने नळातून होणा-या गढूळ पाणीपुरवठ्याबाबत कारणे शोधून योग्य ती उपाययोजना करावी असेही त्या म्हणाल्या.

बैठकीचे प्रास्ताविक क्षेत्रिय अधिकारी श्रीनिवास दांगट यांनी केले तर सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन यांनी आभार मानले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.