चंद्रकांतदादांवर राऊतांचा सव्वा रुपयाचा दावा, पत्रकाराच्या प्रश्नानंतर उदयनराजेंनी थेट बुकेच दिला!
सातारा : भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले कधी काय करतील, याचा नेम नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत सव्वा रुपयाचा दावा ठोकणार असल्याच्या वृत्ताबाबत एका पत्रकाराने उदयनराजेंना प्रश्न विचारला. त्यावर त्यांची प्रतिक्रिया सर्वांना चकित करणारी तर होतीच, मात्र उपस्थितांची हसून पुरेवाटही झाली.
नेमकं काय घडलं?
भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांची साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात विकास कामांबाबत मुलाखत सुरु होती. त्यानंतर एका पत्रकाराने संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांवर सव्वा रुपयाचा दावा ठोकणार असल्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर उदयनराजेंनी गाडीतील बुके काढून पत्रकाराला देत त्याचा सत्कार केला. “तुम्ही अत्यंत संयमाने मला साथ दिलीत, त्याबद्दल माझ्या वतीने आपल्या सर्वांना हा पुष्पगुच्छ” असं उदयनराजे म्हणाले. यावेळी सर्व पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला.

