• शिक्षण होईपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले अनिकेतला दत्तक
यवतमाळ,दि.25 : बोरगाव ता. आर्णी येथे कार्यरत तलाठी अजय दिगंबर पस्तापूरे यांचा दि. 12 सप्टेंबर 2021 रोजी अपघाती मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शोक व्यक्त करून त्यांच्या कुटूंबियांचे आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे सांत्वन केले. तसेच या कठीण प्रसंगी प्रशासन त्यांच्या सोबत असल्याचा धीर दिला.
याप्रसंगी दिवंगत तलाठी अजय पस्तापुरे यांच्या पत्नी अर्चना पस्तापुरे, मुलगा अनिकेत, मुलगी राधीका, भाऊ विनोद पस्तापुरे, साळे विश्वास टाले तसेच निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे हे हजर होते.
जिल्हाधिकारी येडगे यांनी पस्तापुरे यांच्या अपघाती मृत्यूबाबबत त्यांच्या कुटूंबाची काही तक्रार किंवा आक्षेप आहे का, याबाबत विचारना केली असता त्यांनी काही तक्रार नसल्याची प्रतिक्रीया दिली.
यावेळी दिवंगत अजय पस्तापुरे यांचा मुलगा अनिकेत याचेकडून अनुकंपा नौकरीचा अर्ज भरून घेण्यात आला. पस्तापुरे यांचे कुटूंबीयांना तहसिलदार आर्णी यांचे कार्यालयाकडून तात्पुरते कुटूंब पेंन्शन योजनेचा आदेश देण्यात आला असून त्यांचे भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळण्याबाबत महालेखापाल नागपूर यांचेकडे अंतीम मंजूरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच गट विमा योजने अंतर्गत् चार लाख दोन हजार रुपयांचा लाभ निर्गमित केला असून लगेच त्यांचे कुटुंब पेन्शन खात्यात जमा करण्यात येणार आहे व रजा रोखीकरणाअंतर्गत देय लाभ येत्या आठवडाभरात कुटूंब पेन्शन खात्यात जमा करण्यात येणार आहे.
मुलगा अनिकेत पस्तापुरे याची उच्च शिक्षण घेवून मोठ्या पदावर जाण्याची इच्छा त्याने व्यक्त केली असता जिल्हाधिकारी येडगे यांनी त्याच्या शिक्षणासाठी येणाऱ्या खर्चाची जबाबदारी घेत असल्याचे सांगितले.
व अनिकेत ला पुढील शिक्षणासाठी जिल्हाधिकारी ह्यांनी दत्तक घेत असल्याचे कुटुंबीयांना सांगितले. पस्तापुरे कुटूंबियांना कोणतीही अडचण आल्यास आपण मदतीसाठी तत्पर असल्याचे जिल्हाधिकारी येडगे यांनी त्यांना आश्वस्त केले.

