बीड उस्मानाबाद सह लातूर जिल्ह्याची तहान भागवणारे मांजरा धरण तुडुंब भरले.
कळंब तालुका,(रवींद्र ओव्हाळ प्रतिनिधी कळंब तालुका) : बीड उस्मानाबाद सह लातूर जिल्ह्याची तहान भागवणारे मांजरा धरण मंगळवारी दि (२१) रोजी दुपारी एक वाजता शंभर टक्के भरले असून धरणातील पाणी पातळी नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी धरणाच्या उजव्या कालव्याचे सहा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. मांजरा धरणाची साठवण क्षमता २२४ दलघमी असून काल सकाळपर्यंत या धरणात २२३.६२५ दलघमी साठा होता. दुपारनंतर मुसळधार पावसाने धरणात पाण्याची आवक वेगाने वाढली आणि बुधवारी सकाळी पहाटेपर्यंत धरणात २२५.५ दलघमी साठा झाल्याने धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले.
सहा वर्षाच्या दुष्काळानंतर 2016 साली झालेल्या मुसळधार पावसाने या धरणाचे दरवाजे उघडण्याचा योग आला होता. त्यानंतर नियमितपणे हे धरण प्रतिवर्षी पूर्ण क्षमतेने भरत आहे. यंदाही निसर्गाने भरभरून दान दिल्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी हे धरण तुडूंब भरले असून धरणाचे दरवाजे उघडण्याचा सुखवाह प्रसंग आज अनुभवयास मिळाला असून सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला.

