जिल्ह्याच्या पर्यटन विकासात औद्योगिक क्षेत्र महत्वपूर्ण भूमिका बजावेल-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

0 झुंजार झेप न्युज

• किर्लोस्कर ऑईल इंजिन्स कंपनीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली भेट

कोल्हापूर,दि.30 : जिल्ह्याच्या पर्यटन विकासात औद्योगिक क्षेत्रही महत्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर जिल्ह्याला पर्यटन क्षेत्र म्हणून जागतिक पातळीवर मानाचे स्थान मिळवून देण्याच्या दृष्टीने पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्या वतीने दि.२६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान 'पर्यटन दिन सप्ताह' आयोजित करण्यात आला आहे. याअंतर्गत औद्योगिक पर्यटन (इंडस्ट्रीयल टुरिझम) विकासाच्या दृष्टीने कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील किर्लोस्कर ऑइल इंजिन्स येथे आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी भेट दिली. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी याठिकाणी क्षेत्रभेट देऊन माहिती घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे, तहसीलदार शिल्पा ठोकडे, कागल- हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहत, इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष गोरख माळी, गोशिमाचे अध्यक्ष मोहन पंडितराव, किर्लोस्कर ऑईल इंडस्ट्रीचे उपाध्यक्ष चंद्रहास रानडे, उद्योगपती सचिन मेनन, किर्लोस्कर एच आर विभागाचे महाव्यवस्थापक धीरज जाधव, वरिष्ठ महाव्यवस्थापक (युटिलिटीज) विवेक देशपांडे, एचआर व्यवस्थापक राहूल पवार, क्रेडाईचे आदित्य बेडेकर, पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, औद्योगिक क्षेत्रात 'किर्लोस्कर' ही प्रख्यात व अग्रगण्य कंपनी आहे. कोल्हापूरमधील औद्योगिक क्षेत्राला जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी आणि संपूर्ण भारतातील महाविद्यालयीन क्षेत्रभेटींसाठी हा उपक्रम या पुढेही राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी श्री.रेखावार यांनी सांगितले. तसेच कंपनीतील वेस्ट प्लास्टिक पासून इंधन तयार करण्याच्या प्लांटला भेट देवून हा एक अभिनव आणि यशस्वी प्रयोग असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित मान्यवरांना हँडमेड फ्लॉवर्स, घरटे, दिवा अशा इकोफ्रेंडली भेटवस्तू देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कंपनीचे उपाध्यक्ष(ऑपरेशन्स) व प्लॅन्टचे प्रमुख चंद्रहास रानडे यांनी जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांचे स्वागत करुन उद्योग समूहाबाबत माहिती दिली. पर्यटन सप्ताह उपक्रमाचे कौतुक करुन किर्लोस्कर उद्योग समूहाच्या वतीने या उपक्रमास सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

आजच्या भेटीसंदर्भात थोडक्यात-

१. प्लास्टिक इंधन प्लांट

२. जलसंवर्धन उपक्रम- कुंड, पाझर तलाव, शेत तळी, विहिरी. परिसरात पडणारा पावसाचा थेंब/पाणी अडवले आणि मुरवले जाते

३. सेंद्रीय शेती: सध्या ३ एकर क्षेत्र विकसित केलेय आणि ते हळूहळू वाढविण्यात येत आहे. पालक, काकडी, मुळा, तांदळी, भेंडी, फ्लॉवर, कोबी इ. पिके पूर्णतः नैसर्गिक पद्धतीनं वाढवली जात आहोत. कीडनाशके देखील इथंच जैविक पद्धतीनं बनवली जातात. सर्व भाज्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या कँटीन मधून दिली जातात. 

४. जट्रोफा पासून जैव इंधनाचा वापर देखील कंपनीच्या अंतर्गत वाहतुकीसाठी असलेल्या वाहनांमध्ये केला जातो. 

५. बायोगॅस प्लांट

६. सोलर पॉवर प्लांट- एकूण ७.२ मेगावॉट उत्पादित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.