आज भाजप नेते व महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा वाढदिवस.

0 झुंजार झेप न्युज

आज भाजप नेते व महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा वाढदिवस.

मुंबई,दि.१३ ऑक्टोबर १९६८ : प्रवीण दरेकर यांची माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून भाजपमध्ये ओळख आहे. मूळचे रायगड जिल्ह्यातील पोलादपूरमधील असलेल्या प्रवीण दरेकरांच्या राजकीय जीवनाची सुरुवात मुंबईतून झाली. प्रवीण दरेकर यांचा जन्म रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील वसाप या गावी झाला. वडील एसटी कंडक्टर होते. मात्र, वडिलांची एसटीतली नोकरी सुटल्यानं घर चालवण्यासाठी प्रवीण दरेकरांच्या आईनं मासळी विकण्यास सुरूवात केली. त्यांचं दहावीपर्यंतचं शालेय शिक्षण पोलादपुरातच झालं. १९८९ साली मुंबई विद्यापीठातून कॉमर्स विषयात पदवी संपादित करून पुढे त्यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण केलं.

१९८९ सालापासून प्रवीण दरेकर यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात शिवसेनेतून केली. भारतीय विद्यार्थी सेनेचे (भाविसे) ते राज्य सरचिटणीस होते. राज ठाकरे त्यावेळी भाविसेची जबाबदारी सांभाळत होते. राज ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून प्रवीण दरेकरांची ओळख होती.

१९९७ मध्ये प्रवीण दरेकर मुंबई महापालिकेची निवडणूक लढवू इच्छित होते. त्यांना दहिसरमधून तिकीटही जाहीर झालं. त्यामुळं आभारासाठी ते 'मातोश्री'वर गेले. तिथून घरी परतले, तर तोपर्यंत त्यांचं तिकीट कापलं गेलं होतं. त्यामुळे त्यांची शिवसेनेतली घुसमट अशी साचत गेली. शिवसेनेतल्या नाराजांना आणि आपल्या समर्थकांना घेऊन राज ठाकरेंनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. ज्यावेळी राज ठाकरेंनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली, ती पुढे २००६ साली मनसेच्या रूपात समोर आली, त्यावेळी दरेकरांनी मनसेत प्रवेश केला. त्यावेळी प्रवीण दरेकरांनी राज ठाकरेंना साथ दिली. २००९ मध्ये मनसे पक्ष ज्यावेळी पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरा गेला, त्यावेळी प्रवीण दरेकर मुंबईतल्या मागाठाणे मतदारसंघातून विजयी झाले. शिवसेनेतील आक्रमकपणा मनसेत आल्यानंतरही प्रवीण दरेकरांनी सोडला नाही. माध्यमांमधून मनसेची बाजू मांडत असत.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दरेकर पुन्हा मागाठाणे मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर लढले, मात्र पराभूत झाले. त्यातच मनसेला गळती लागली. मोठे नेते सोडून जाऊ लागले. त्यातले एक प्रवीण दरेकरही होते. जानेवारी २०१५ मध्ये प्रवीण दरेकरांनी मनसेला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पुढच्याच वर्षी म्हणजे जुलै २०१६ मध्ये प्रवीण दरेकर भाजपतर्फे विधानपरिषदेत गेले. माध्यमांमधून भाजपची बाजू मांडण्यातही प्रवीण दरेकर पुढाकार घेत असतात.

डिसेंबर २०१९ मधील नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात प्रवीण दरेकर यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत नऊ महिन्याच्या अल्पावधीच्या काळात त्यांनी खर्याव अर्थाने विरोधी पक्षनेता म्हणून धडाधीडेने काम केले आहे. विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासह प्रवीण दरेकर सध्या भाजपचे राज्य सचिव आहेत. शिवाय, भाजपच्या सहकार विभागाचे प्रमुखही आहेत. प्रविण दरेकर हे सध्या मुंबई बॅंकेचे अध्यक्ष म्हणूनही काम बघतात. मुंबै बँकेतील घोटाळ्यावरून प्रवीण दरेकर यांच्यावर आरोपही झाले. हे आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत. पुस्तके वाचण्यात आणि जुनी गाणी ऐकण्याचा त्यांचा छंद आहे. प्रविण दरेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.