राज्यस्तरीय शालेय बेसबॉल स्पर्धेचे उद्घाटन
वर्धा,दि.17: प्रत्येक स्पर्धेत जय पराजय होत असतो. त्याने खचून न जाता खेळाडूंनी पुढील स्पर्धेसाठी तयारी ठेवली पाहिजे. आपल्या खेळातून उत्कृष्ट प्रदर्शन प्रत्येक खेळाडूने करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.जिल्हा क्रिडा संकुल येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रिडा परिषद व महाराष्ट्र बेसबॉल संघटनेच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय बेसबॉल क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, नागपूर विभागाचे क्रिडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रिडा अधिकारी लतिका लेकुरवाळे, महाराष्ट्र बेसबॉल संघटनेचे सहसचिव इंद्रजित नित्तनवार, शिवछत्रपती पुरस्कारार्थी किशोर पोफळी, रामराव किटे आदी मंचावर उपस्थित होते.
बेसबॉल क्रिडा प्रकार हा अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ असला तरी भारतामध्ये या खेळाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. राज्यातील बेसबॉल खेळासाठी खेळाडूंचा मोठा सहभाग मिळत असल्याने ही देशासह राज्यासाठी गौरवाची बाब आहे. विजयी चमूला देशपातळीवर आपल्या चमूचे नाव लौकिक करण्याची संधी मिळेल. या खेळामुळे जिल्ह्यातील खेळांडूना सुध्दा प्रोत्साहन मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री.कर्डिले म्हणाले.
बेसबॉल हा क्रिडा प्रकार जिल्ह्यात प्रचलित नसला तरी जिल्ह्यातील खेळाडूंना या खेळप्रकारातून प्रोत्साहन मिळून जिल्ह्यात बेसबॉल खेळाचे चांगले वातावरण तयार होण्यास मदत होईल, असे यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले. बेसबॉल स्पर्धा दि.16 ते 18 जानेवारी पर्यंत चालणार असून राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर, अमरावती व नागपूर या आठ विभागातील आठ चमूतील वय 17 वर्ष वयोगटातील मुले व मुली असे 300 खेळाडू सहभागी झाले आहे. 10 पंच व 3 तांत्रिक सदस्याचा स्पर्धेमध्ये समावेश असल्याचे प्रास्ताविकातून लतिका लेकुरवाळे यांनी सांगितले. यावेळी क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे, अनील निमगडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन ज्योती भगत यांनी केले.

