स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवडची भरारी !!

0 झुंजार झेप न्युज

• शहराचा देशात १३ वा तर राज्यात तिसरा क्रमांक...

पिंपरी चिंचवड,दि.11: शहर स्वच्छतेसाठी गेल्या वर्षभरापासून राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड शहराने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली आहे. गेल्या दोन वर्षांपासून शहराचा १९ वा क्रमांक असताना यावर्षी देशात १३ वा तर राज्यात तिसरा क्रमांक मिळाला आहे.केंद्रीय विकास नागरी मंत्री हरदिपसिंह पुरी यांच्या हस्ते आज दिल्लीत पुरस्कार सोहळ्याचे वितरण झाले. महापालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त यशवंत डांगे, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्विकारला.यावेळी आरोग्य विभागाचे आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, प्रभारी कार्यकारी अभियंता हरविंदर बन्सल आदी उपस्थित होते. 

केंद्र सरकारच्या वतीने देशात २०१६ मध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यास सुरूवात केली. पहिल्याच वर्षी शहराचा स्वच्छतेमध्ये नववा क्रमांक आला. त्यानंतर शहर स्वच्छतेमध्ये सातत्याने पिछाडीवर गेले होते. महापालिकेतर्फे विविध पातळ्यांवर जनजागृती आणि उपक्रम सुरू करुन स्वच्छागृह, सार्वजनिक स्वच्छतागृह महिलांना चालविण्यासाठी दिले. ओला, सुका कचरा वर्गीकरणावर भर दिला. जनजागृती केली. शहराच्या विविध भागात प्लॅगेथॉन मोहिम राबवून कचरा उचलला. सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर कारवाईसाठी ग्रीन मार्शल पथकाची नेमणूक केली.  

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत देश पातळीवर शहरांच्या स्वच्छतेबाबतचे परीक्षण करण्यात आले. सेवा स्तर गुणांक, नागरिकांचा प्रतिसाद आणि कचरा मुक्त, हागणदारी मुक्त शहर या घटकांवरती केंद्र शासनाने नेमलेल्या त्रयस्थ संस्थेमार्फत परीक्षण करण्यात आले.

स्वच्छ सर्वेक्षणात सन २०१६ मध्ये शहराचा देशात नववा क्रमांक आला होता. २०१७ मध्ये शहराचा ७२ व्या क्रमांक आला होता. २०१८ मध्ये ४३ वा क्रमांक, २०१९ मध्ये ५२ वा क्रमांक, २०२० मध्ये २४ वा क्रमांक, २०२१ मध्ये १९ वा क्रमांक, २०२२ मध्येही १९ वा क्रमांक कायम होता. २०२३ मध्ये शहर स्वच्छतेमध्ये देशात १३ वे तर राज्यात तिस-या क्रमांकावर आले आहे. 

प्रतिक्रिया : 

शहराला प्रथमच कचरा मुक्त शहरात पंचतारांकित मानांकन आणि हागणदारी मुक्त शहराचे सर्वोच्च वॉटर प्लसचा पुरस्कार मिळाला आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात क्रमवारी सुधारावी, यासाठी गेल्या वर्षभरापासून आराेग्य विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले. याला लोकप्रतिनिधी,सामाजिक कार्यकर्ते तसेच शहरवासीयांनी मोठे सहकार्य केले आहे. त्यामुळेच स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड अव्वलस्थानी आले आहे.

- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक 

प्रतिक्रिया : 

स्वच्छ सर्वेक्षणातील यश हे शहरवासीयांसह आराेग्य, पर्यावरण विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, विशेष करून सफाई कर्मचा-यांचे आहे. आगामी काळात शहर कसे स्वच्छ राहील, याकडे विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

- यशवंत डांगे, सहाय्यक आयुक्त, आरोग्य

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.