स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरून पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये पुन्हा धुसफूस

0 झुंजार झेप न्युज

२० ऑगस्टच्या स्थायी समिती सभेकडे लक्ष; सात जागांसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी, सचिन काळभोर यांच्या नावाचीही जोरदार चर्चा

पिंपरी-चिंचवड, दि.19: चिंचवड महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा तिढा अद्याप कायम असून, येत्या २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत या विषयावर काय निर्णय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या तीन स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती झाल्याचे सांगितले जात असताना, भारतीय जनता पक्षाच्या वाट्याच्या सात जागांवरील नावे जाहीर न झाल्याने यापूर्वी हा विषय तहकूब करण्यात आला होता.

दरम्यान, भाजपच्या सात स्वीकृत नगरसेवक पदांसाठी इच्छुकांची संख्या मोठी असून, पक्षांतर्गत राजकीय समीकरणे आणि गटबाजीमुळे नियुक्तीचा निर्णय रखडल्याची चर्चा महानगरपालिका वर्तुळात सुरू आहे.

सचिन काळभोर यांच्या नावाने राजकीय चर्चेला उधाण

भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांची स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी महापौर रवी भाऊ लांडगे आणि उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे लेखी पत्राद्वारे केल्याचे सांगितले जात आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही यासंदर्भात मागणी करण्यात आल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे, सचिन काळभोर आणि आमदार महेश लांडगे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून मतभेद असल्याची राजकीय चर्चा आहे. त्यामुळे काळभोर यांच्या नावासाठी वरिष्ठ पातळीवर करण्यात आलेल्या मागणीमुळे पिंपरी-चिंचवड भाजपमधील अंतर्गत राजकीय समीकरणांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर?

स्वीकृत नगरसेवकांच्या सात जागांवरून भाजपमध्ये विविध गट सक्रिय झाल्याचे चित्र आहे. आमदार महेश लांडगे, शंकरभाऊ जगताप, अमित गोरखे, उमा खापरे, अमर साबळे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, अश्विनी जगताप तसेच पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांच्या गटांकडून इच्छुकांच्या नावांसाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.

स्वीकृत नगरसेवकपदासाठी संधी मिळावी म्हणून अनेक इच्छुकांकडून पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, आमदार, खासदार आणि मंत्र्यांकडे साकडे घालत इच्छुकांनी आपापल्या नावासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

शहराध्यक्षांकडून प्रदेशाध्यक्षांकडे पत्रव्यवहार

भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनीही स्वीकृत नगरसेवक पदासाठी पक्षाच्या माध्यमातून इच्छुक असलेल्या उमेदवारांची नावे जाहीर करून नियुक्तीची प्रक्रिया पुढे नेण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली असल्याचे सांगण्यात येते.

प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या सात स्वीकृत नगरसेवक पदांसाठी इच्छुकांची नावे निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणाला संधी मिळते आणि कोणाची वर्णी लागते, याबाबत पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

सहा महिन्यांपासून नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित

महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा विषय गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित आहे. यापूर्वी भाजपकडून सात नावे जाहीर न झाल्याने नियुक्तीचा विषय पुढे ढकलण्यात आला होता. आता २० ऑगस्टच्या स्थायी समिती सभेत हा विषय पुन्हा चर्चेला येणार असल्याने यावेळी नियुक्तीचा मार्ग मोकळा होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या सात जागांचा निर्णय अद्याप न झाल्याने पक्षांतर्गत नाराजी आणि इच्छुकांची अस्वस्थता वाढल्याची चर्चा आहे.

विषय पुन्हा तहकूब होणार की नियुक्तीचा मार्ग मोकळा?

२० ऑगस्ट रोजी सात स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर होणार असल्याची चर्चा असली, तरी पक्षातील अंतर्गत मतभेद आणि इच्छुकांची मोठी संख्या पाहता हा विषय पुन्हा तहकूब होणार का, की अखेर नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब होणार, याची उत्सुकता आहे.

स्वीकृत नगरसेवकपदाच्या सात जागांसाठी अनेक जण इच्छुक असल्याने अखेर कोणाच्या गळ्यात पदाची माळ पडते, याकडे केवळ भाजप कार्यकर्त्यांचेच नव्हे तर संपूर्ण पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, भाजपमधील गटबाजीच्या चर्चेला स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीमुळे पुन्हा उधाण आले असून, पक्षश्रेष्ठी कोणता तोडगा काढतात, हे २० ऑगस्टच्या सभेत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.