सचिन काळभोर यांचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना निवेदन; पक्षांतर्गत मनमानी कारभाराची चौकशी करून हस्तक्षेपाची मागणी
पिंपरी-चिंचवड,दि.21: पिंपरी-चिंचवड शहर भाजपमध्ये पक्षांतर्गत मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप करत भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपची सत्ता असून, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली महापौर रवी लांडगे हे लोककल्याणकारी कामे करत असल्याचा दावा काळभोर यांनी निवेदनात केला आहे. मात्र, पक्षातीलच काही स्थानिक नेत्यांकडून महापौरांना अपेक्षित पद्धतीने काम करू दिले जात नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
गेल्या वर्षभरात तब्बल तीन वेळा पक्षाच्या नेत्यांकडून सभा तहकूब करण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला असून, त्यामुळे महापौरांच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे काळभोर यांनी म्हटले आहे.
या प्रकारामागे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे जबाबदार असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. शितोळे हे जाणीवपूर्वक आणि योग्य कारणाशिवाय महापौरांच्या विकासकामांमध्ये तसेच दैनंदिन प्रशासकीय कामकाजात अडथळे निर्माण करत असल्याचा दावा काळभोर यांनी केला आहे.
पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत असताना, स्थानिक पातळीवरील अंतर्गत मतभेद आणि मनमानी कारभारामुळे पक्षाची प्रतिमा जनमानसात खराब होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची प्रदेश नेतृत्वाने गांभीर्याने दखल घेऊन वैयक्तिक लक्ष घालावे, संबंधित पदाधिकाऱ्यांना योग्य सूचना द्याव्यात आणि महापौरांना कोणत्याही अडथळ्याशिवाय विकासकामे व प्रशासकीय कामकाज करण्याचे स्वातंत्र्य मिळवून द्यावे, अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.
दरम्यान, निवेदनातील आरोपांबाबत संबंधित पदाधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व काय भूमिका घेते, याकडे पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

.jpg)