पुणे महानगरपालिकेतर्फे वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी 'सर्पदंश व्यवस्थापन' प्रशिक्षण संपन्न
पुणे,दि.03 : पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील मेट्रोपोलिटन सर्व्हिलन्स युनिटच्या (MSU) वतीने २ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता 'सर्पदंश व्यवस्थापन' या विषयावर विशेष प्रशिक्षण कार्यशाळा जुना जी.बी. हॉल, पुणे महानगरपालिका येथे संपन्न झाली. याप्रसंगी १५,००० हून अधिक सर्पदंश रुग्णांना जीवदान देणारे सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.
सर्पदंश हा टाळता येण्यासारखा शेतीसंदर्भात होणारा गंभीर अपघात असून तातडीने योग्य उपचार मिळाल्यास विषारी सर्पदंश झालेला गंभीर रुग्ण वाचू शकतो असे प्रतिपादन जागतिक सर्पदंशतज्ञ व राष्ट्रीय सर्पदंश तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्य डॉ सदानंद राऊत यांनी केले व 'मिशन झिरो स्नेकबाइट डेथ' ची संकल्पना मांडली आणि केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारने सर्पदंश हा अधिसूचित आजार म्हणून घोषित केला आहे. भारतात दरवर्षी २० ते ५० लाख सर्पदंशाच्या घटना घडतात. जगाच्या तुलनेत आपल्या देशात सर्पदंशाचे प्रमाण जास्त असून दरवर्षी ६०००० पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होतो. जागतिक आरोग्य संघटनेने २०३० पर्यंत सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करण्याचे ठरविले आहे. रुग्णाची वैद्यकीय लक्षणे (Clinical Syndrome) अचूकपणे ओळखून तात्काळ उपचार सुरू करणे आवश्यक असल्याचे सांगत, उपचारांमध्ये अँटी-स्नेक व्हेनम (ASV) कधी आणि किती द्यावे, यासाठी त्यांनी 'Rule of 10' ची सविस्तर माहिती दिली. प्रोटोकॉलनुसार योग्य उपचार मिळाल्यास रुग्णांचे प्राण वाचवणे निश्चित शक्य आहे, असा विश्वास त्यांनी दिला. तसेच, सर्पदंश उपचारात नागरिकांमधील अंधश्रद्धा हा सर्वात मोठा अडसर असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नातेवाईकांचे योग्य प्रबोधन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी वेनॉम वॉरियर्स हा माहितीपट दाखविण्यात आला,
या प्रशिक्षणामुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्पदंश रुग्णांवर अधिक प्रभावीपणे उपचार करता येतील असा विश्वास डॉ. वैशाली जाधव ऑफिसर इन्चार्ज MSU तथासहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिकायांनी व्यक्त केला.
या प्रशिक्षण कार्यशाळेस महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी/कर्मचारी आणि MSU स्टाफ असे एकूण ११८ जण उपस्थित होते.

