जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवणार नाही यासाठी आतापासूनच नियोजन करा - पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

0 झुंजार झेप न्युज

एलनिनोच्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाईचा आढावा..

वर्धा,दि,20: यावर्षी सरासरी पर्जन्यमान आणि प्रकल्पांतील जलसाठा तुलनेने कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईचे नियोजन करतांना ते आतापासूनच केले पाहिजे. जिल्ह्यात उपलब्ध पाणीसाठा आणि त्याचा वापर यावर प्रशासनाचे सातत्याने लक्ष ठेवावे, असे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.
एलनिनोच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाई, प्रकल्पातील उपलब्ध होणारा पाणीसाठा व त्याचा वापर याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला आ.सुमित वानखेडे, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, उपजिल्हाधिकारी प्रताप वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ज्ञानदा फणसे आदी उपस्थित होते.

एलनिनोमुळे पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने आतापासूनच पर्यायी उपाययोजनांची तयारी केली पाहिजे. कमी पर्जन्यमान होत असलेल्या दुष्काळी जिल्ह्यांमध्ये तेथील प्रशासनाद्वारे काय उपाययोजना केल्या जातात, त्याचा अभ्यास देखील होणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील उपलब्ध पाणी साठ्याने निरिक्षण करून त्याद्वारे वापरावे नियोजन करावे, असे पालकमंत्री म्हणाले.

अनेक गावांमध्ये छोट्या तलावांमधून पाणी पुरवठा केला जाते. असे तलाव जानेवारी, फेब्रुवारीतच सुकण्याची शक्यता आहे. असे होत असल्यास पर्यायी व्यवस्था असणे गरजेचे आहे. पिण्याच्या पाण्यासाठी तलावांमधील कृषी पाणी पुरवठा खंडीत करावा लागल्यास त्याचा देखील पर्याय देणे महत्वाचे असल्याचे आ.सुमित वानखेडे म्हणाले.
जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी जिल्ह्यातील सद्याचे पर्जन्यमान व उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती दिली. जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सद्या 62 टक्के पाणीसाठा आहे. मोठे व मध्यम प्रकल्पांमध्ये साठा बऱ्यापैकी असून लघु प्रकल्पांत तुलनेने कमी आहे. टंचाई परिस्थितीसाठी जिल्ह्यात टास्क फोर्स गठीत करण्यात आला आहे. पर्जन्यमानाची स्थिती अशीच असल्यास पिक उत्पादनात घट येण्याची शक्यता असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

एलनिनोच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणी टंचाई पाहता जिल्ह्यात विशेष टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. यात 179 गावांमध्ये 251 उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहे. त्यात 59 सार्वजनिक विहिरी खोल करणे, 142 खाजगी विहिरींचे अधिग्रहण, 29 पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, 15 नवीन विंधन विहीरी व काही ठिकाणी टॅंकरने पाणी पुरवठ्याचा समावेश आहे. पाणी स्त्रोतांचे तीन स्तरावर नियोजन करत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी सांगितले.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा आढावा

यावेळी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा आढावा घेतला. जिल्ह्यात या योजनेंतर्गत बॅंकस्तरावर 74 हजार 365 कर्जखाते अपलोड करण्यात आले आहे. त्यापैकी 48 हजार 165 शेतकरी पात्र आहे. 31 हजार 694 शेतकऱ्यांची ई-केवायसी झाली आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या दोन याद्यांमध्ये 23 हजार 330 शेतकऱ्यांचा समावेश असून त्यांच्या खात्यात 230 कोटीची रक्कम जमा करण्यात आली आहे. जिल्ह्यातील उर्वरीत शेतकऱ्यांची ई-केवायसी पुर्ण करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.