- पायाभूत सुविधांच्या माध्यमातून नागपूरला
- डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार उड्डाणपुलाचे लोकार्पण
नागपूर,दि.20: पायाभूत सुविधांच्या माध्यमातून नागपूर शहराला सुव्यवस्थित शहराचे स्वरुप देण्याचा प्रयत्न होत असून शहराच्या भविष्यातील विस्ताराच्या दृष्टीने देखील व्यापक प्रमाणात प्रकल्प हाती घेण्यात येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
शहराच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणाऱ्या आणि उत्तर, मध्य व दक्षिण नागपूरला अधिक सक्षमपणे जोडणाऱ्या इंदोरा-दिघोरी उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने करण्यात आले. या उड्डाणपुलाचे डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार उड्डाणपूल असे नामकरण करण्यात आले आहे. कवी सुरेश भट सभागृहात पार पडलेल्या या लोकार्पण सोहळ्यास राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, आमदार सर्वश्री प्रवीण दटके, मोहन मते, कृष्णा खोपडे, संजय भेंडे, माजी खासदार डॉ विकास महात्मे, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून हा उड्डाणपूल साकारण्यात आला असून तो विक्रमी वेळेत पूर्ण झाला आहे. या उड्डाणपुलामुळे शहराच्या व्यापक भागातील वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हा उड्डाणपूल अभियांत्रिकीचा सर्वोत्तम नमूना आहे. रा. स्व. संघाच्या शताब्दीपूर्तीच्या पार्श्वभूमीवर या उड्डाणपुलास आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांचे नाव देण्याचे पाऊल अतिशय महत्त्वाचे असून या माध्यमातून नागपूरची एक ओळखही जपली जात आहे.
नागपूर शहरात आतापर्यंत ३५ उड्डाणपूल झाले आहेत. तर आणखी १५ प्रस्तावित आहेत, अशी माहिती देऊन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कचऱ्यापासून ऊर्जानिर्मितीचा पर्यावरणपूरक आधुनिक प्रकल्प साकारला जात आहे. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमुळे शहरातील खड्ड्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला आहे. बाह्य रिंगरोडचे काम पूर्ण झाल्यावर आता भविष्यात शहराचा होणारा विस्तार लक्षात घेऊन आणखी एक रिंगरोड तयार केला जाणार आहे. सुमारे २ हजार एकर क्षेत्रात रोजगार केंद्रित असे नवीन नागपूर विकसित करण्याचे नियोजन आहे. नागपूरकडे आधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून पाहिले जात आहे. एक शाश्वत शहर म्हणून नागपूरचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे, याकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष वेधले.
नागपुरातील हा सर्वोत्तम उड्डाणपूल-नितीन गडकरी
नागपुरातील हा सर्वोत्तम उड्डाणपूल असून त्यात सर्वोत्तम अशा आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाचा वापर झाला आहे. या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार असून अंतर तसेच वाहतुकीला लागणारा वेळही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. आगामी काळातही शहरात पायाभूत सुविधांचे प्रकल्प व्यापक प्रमाणात राबविले जाणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले. यावेळी बोलताना गडकरी यांनी आगामी काळात शहरात राबविण्यात येणाऱ्या काही योजनांची माहितीही दिली.
*व्यापक प्रमाणात विकासकामे होणार- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे*
नागपूर शहरात आगामी काळात प्रत्येक विधानसभा क्षेत्रात दोन मोठे विकासप्रकल्प राबविले जाणार असून शहरासाठी आगामी काळात १ हजार कोटींची तरतूद उपलब्ध होणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी बोलताना दिली. दीक्षाभूमीच्या विकासाचा आराखडा देखील मंजूर झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उड्डाणपुलाशी संबंधित कंपनी तसेच महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
असा आहे हा उड्डाणपूल
सुमारे ९९८ कोटी रुपयांच्या ८.९० किलो मीटरच्या या इंदोरा-दिघोरी उड्डाणपुलासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
या उड्डाणपुलामुळे शहरातील अनेक भागांतील वाहतूक कोंडीची समस्या कमी होणार असून जलद वाहतुकीला चालना मिळणार आहे. या उड्डाणपुलाच्या मार्गात अनेक ठिकाणी रॅम्पची सुविधा देण्यात आल्याने वाहतूक सुरळीत होण्यासह रस्त्यांच्या कनेक्टिव्हीटीला मोठी मदत होणार आहे. उड्डाणपुलाच्या मार्गात अशोक चौक येथे भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रतिवर आधारित २२ म्यूरल्स बसविण्यात आले आहेत.
