सातारा आगारातून सकाळी सुटणारी सातारा-कास-धावली या गाडीला आज सकाळी धावली गावात जात असताना अपघात झाला. या अपघातातील प्रवाशी मात्र सुखरूप बचावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, धावली गावात जाण्यासाठी एसटी धावली फाट्यावरील पहिल्या वळणावर गेल्यावर एसटी चालकाला गाडीचे ब्रेक निकामी झाल्याचा लक्षात आले. त्यावर चालकाने गाडीचा रिव्हर्स गिअर टाकून गाडी थोडी मागे घेत सर्व प्रवाशी गाडीतून खाली उतरवले. यानंतर ही गाडी मागे घेत असताना मागे चढ-उतार आणि वेडीवाकडी वळणे आहेत. त्यातच एसटीचा रिव्हर्स टाकलेला गिअर निसटला आणि ब्रेक निकामी असल्याने एसटी बाजूच्या नाल्यात जाऊन धडकली.
या अपघातात महिला कंडक्टर किरकोळ जखमी झाली आहे. यानंतर लगेचच ग्रामस्थांनी धावली येथील परळी अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रात महिला कंडक्टरला दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. मात्र सर्व प्रवाशी अगोदरच बसमधून खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला.

