मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले. मनसेचा नवा ध्वज भगव्या रंगाचा असून छत्रपती शिवाजी महाराजांची मध्यभागी राजमुद्रा आहे. महाविकासआघाडी सरकारवर नजर ठेवण्यासाठी मनसेने आता मंत्रिमंडळावर 'शॅडो कॅबिनेट'ची नेमणूक करण्यात येणार आहे. राज्य सरकारमधील प्रत्येक मंत्र्यावर नजर ठेवण्यासाठी मनसेतून एक-एका नेत्याची नेमणूक केली जाण्याची शक्यता आहे.
सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी 'शॅडो कॅबिनेट'ची मनसेकडून संकल्पना राबविण्यात येणार आहे. ही संकल्पना इंग्लंड आणि अमेरिकेच्या धर्तीवर महाराष्ट्रात मनसे राबविणार आहे. शॅडो कॅबिनेटची घोषणा आज (२३ जानेवारी) मनसेच्या राज्यव्यापी महाअधिवेशनात दुपारी ३ वाजता होणार आहे.
शॅडो कॅबिनेट म्हणजे नेमके काय?
सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी 'शॅडो कॅबिनेट'ची मनसेकडून संकल्पना राबविण्यात येणार आहे. अठराव्या शतकात इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीत कॅबिनेट पद्धतीला सुरुवात झाली. सरकारवर लक्ष ठेवणाऱ्या विरोधी पक्षाच्या कॅबिनेटला 'शॅडो कॅबिनेट' म्हणतात. कॅबिनेटमध्ये प्रथम श्रेणीचे १५ ते २० मंत्री असतात. राज्यमंत्री, उपमंत्री यांचा कॅबिनेटमध्ये समावेश नसतो. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या कॅबिनेटमध्ये मात्र ३३ मंत्र्यांचा समावेश आहे. त्यामुळे मनसेच्या प्रत्येक नेत्याकडे दोन-दोन मंत्र्यांची जबाबदारी दिली जाण्याची चिन्हे आहेत.

