मुंबई : भाजपच्या जयभगवान गोयल यांच्या आज के शिवाजी : नरेंद्र मोदी या पुस्तकावरून राज्यातील राजकीय वातावरण आता अधिकच तापताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून या पुस्तकावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत, आता त्यांनी छत्रपतींच्या प्रत्येक गादी विषयी आम्हाला आदर आहे. परंतु, छत्रपती उदयनराजे यांचा सातारा येथे पराभव घडवून आणला, हा शिवरायाच्या वंशजांचा अपमान असल्याचे सांगत, याबद्दल भाजपा शिवरायांच्या वंशजांची व महाराष्ट्राची माफी मागेल काय? असा सवाल केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे.
तर दुसरीकडे, उदयनराजे भोसले यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज असल्याचा पुरावा मागणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आणि साताऱ्याच्या गादीचा अपमान केला आहे. संजय राऊत यांच्या या मस्तवाल विधानाचा आपण निषेध करतो. छत्रपतींच्या घराण्याचा हा अपमान भाजपा आणि महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
शिवसेनेला आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार उरला नसून या अपमानाबद्दल शिवसेनेने माफी मागितली पाहिजे. विश्वासघाताने सत्तेवर आल्यामुळे शिवसेना नेत्यांच्या डोक्यात मस्ती गेली आहे. संजय राऊत यांच्या आजच्या विधानावरून हेच दिसत आहे. शिवसेना राऊतांच्या या उद्दाम सवालाशी सहमत आहे का? हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर कारवाई केली तरच त्यांच्या भूमिकेबद्दल लोकांची खात्री पटेल. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेले आहे.

