केंद्र सरकार शेतकरी कर्जमाफीसाठी महाराष्ट्राला मदत देताना दुजाभाव करत नकार देत असेल, तर शिवसेना कधीही दिल्लीसमोर झुकणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आहे. सांगलीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशाची अर्थव्यवस्था कोणामुळे कोमात गेली आहे, हे तपासून पाहण्याचा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला आहे.
शिवसेना कधी दिल्लीसमोर झुकणार नाही. शिवसेना सोबत होती म्हणून भाजपचे खासदार देखील निवडून आले आहेत. शिवसेना-भाजपने एकत्र लढून केंद्रात सरकार आणलं. केंद्राचे सरकार राज्याचे पालक असायला पाहिजे.मात्र केंद्र सरकार मदत देताना दुजाभाव करत नकारघंटा वाजवणार असेल तर शिवसेना कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघातील अनेक विकास कामांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते उद्घाटनं झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संघाला देखील टोला लगावला. आमचा संघ चांगलाच उत्तम आहे. संघ म्हणजे टीम, जाऊद्या नको तो वाद , असं म्हणत त्यांनी संघालाही टोला लगावला. शेतकरी सगळ्यात महत्त्वाचे आहेत. सध्या शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांसाठी काम करण्याची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. आता ती इच्छा पूर्ण करण्याची संधी मला मिळाली असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आज सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री @Jayant_R_Patil जी यांनी सांगली जिल्ह्यातील साखराळे येथे स्वागत केले.
68 people are talking about this
सहकार क्षेत्र आधीही मरू देणार नाही, पण शेतकऱ्याचं हित सर्वात आधी ठेवलं पाहिजे. या मताचा मी आहे, असं म्हणत 2 लाखापर्यंतच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच आहोत. मात्र 2 लाखावरील ज्यांचं कर्ज आहे त्या शेतकऱ्यांना दिलासा देऊ, असेही ते म्हणाले.
काळजी करु नका. सध्याचं सरकार बदललं आहे. आमचं सरकार हे सूड उगवणारं सरकार नाही. आधीच्या सरकारने जे चांगलं केलं आहे ते सुरू ठेवणार. शेतकऱ्यांसाठी आपलं सरकार काम करणार, अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी दिली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी जयंत पाटील यांचं कौतुकही केलं. सांगलीत केलेलं काम उत्तम आहे. जयंतराव तुम्ही सगळे कार्यक्रमच करुन टाकले आहेत. मी जयंत पाटील यांचं भाषण मन लावून ऐकतो. जयंत पाटील बोलतात तेव्हा आपल्याला वाटतं की ते कौतुक करतात. आपल्याला गुदगुल्याही होतात. मात्र घरी गेल्यावर आणि नीट विचार केल्यावर समजतं की आपले ओरबाडे निघतात. चांगलं काम करण्याची संधी मिळाली आहे. सगळ्यांसाठीच चांगलं काम करायचं असंही मुख्यमंत्री म्हणालेत.


