जालन्यातील कोरोना संसर्गाचा कहर रोखण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री आणि जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी कंबर कसली आहे.
जालना: जालन्यातील कोरोना संसर्गाचा कहर रोखण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री आणि जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी कंबर कसली आहे. राजेश टोपे यांनी जालन्यातील कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाला काही सूचना केल्या असून या सूचना सक्तीने पाळण्याचे निर्देशही दिले आहेत.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली काल रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टोपे यांनी या सूचना दिल्या. या बैठकीला जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, डॉ. संजय जगताप, डॉ. प्रताप घोडके, डॉ. कडले, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, अन्न व औषध प्रशासनविभागाच्या अंजली मिटकर आदी उपस्थित होते.
रोज एक हजार स्वॅब गोळा करा
जालना जिल्ह्यात ट्रेसिंग व टेस्टींगची संख्या वाढविण्यात यावी. जालना जिल्ह्यासाठी स्वतंत्र अशी आरटीपीसीआर लॅब आहे. या लॅबची दरदिवसाची क्षमता एक हजार स्वॅब तपासणीची असून दरदिवशी एक हजार टेस्ट झाल्याच पाहिजेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाव्यतिरिक्त जालना शहरामध्ये अधिक प्रमाणात स्वॅब संकलन केंद्र उघडण्यात यावीत. एक हजार स्वॅबपेक्षा अधिक स्वॅब गोळा करण्यात आल्यास अहवालास उशिर होऊ नये यादृष्टीने स्वॅब औरंगाबाद अथवा पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात यावेत. कोरोना बाधितांच्या संपर्कामधील सहवासितांचा अचूकपणे शोध घेऊन त्यांचे अलगीकरण करण्यावर भर देण्यात यावा. साधारणपणे एका बाधित व्यक्तीच्या संपर्कातील 20 व्यक्तींचा शोध घेण्यात येऊन त्यांचे तातडीने अलगीकरण करण्यात यावे. सहवासितांचा शोध घेण्याकामी शिक्षक, अंगणवाडी सेविका, संग्राम आदींची मदत घेण्यात यावी. कोरोना बाधितांच्या सहवासितांचा डेटा नियमितपणे अपलोड होईल, यादृष्टीनेही काळजी घेण्याचे निर्देश टोपे यांनी दिले.
गट अधिकाऱ्यांनी गावे दत्तक घ्यावीत
ज्या व्यक्तींना सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे आहेत अशा व्यक्तींची अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यामार्फत माहिती घेण्यात येऊन त्यांची तातडीने तपासणी करण्यात यावी. ज्या व्यक्तींना सौम्य व मध्यम लक्षणे आहेत व ज्यांच्याकडे घरी पुरेशा प्रमाणात होम क्वारंटाईनसाठी जागा आहे, अशाच व्यक्तींना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम क्वारंटाईनची मुभा देण्यात यावी व ज्यांच्याकडे होम क्वारंटाईनसाठी जागा नाही व ज्यांना गंभीर लक्षणे आहेत अशा सर्वांचे सक्तीने संस्थात्मक अलगीकरण करण्यात यावे. ग्रामीण भागामध्येही गट आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रत्येक चार ते पाच गावे दत्तक घेऊन गावांमध्ये नियमितपणे जाऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
खासगी रुग्णालयांवर वॉच ठेवा
कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यादृष्टीने जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपलब्ध असलेल्या बेडव्यतिरिक्त अधिकचे ऑक्सिजन बेडची तातडीने निर्मिती करण्यात यावी. यासाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य तातडीने उपलब्ध करुन घेण्याबरोबरच बेडचे व्यवस्थित व निटनेटके नियोजन करण्याबरोबरच बेड तसेच आरोग्य सेवांची माहिती नागरिकांना एका क्लिकवर मिळण्यासाठी डॅशबोर्डची निर्मिती करण्यात यावी. खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांकडून अधिकचे पैसे तर घेण्यात येत नाही ना याबाबत खात्री करण्यात येऊन रुग्णांकडून उपचारापोटी देण्यात येणारी देयकांची लेखा परिक्षकांमार्फत नियमितपणे तपासणी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
लसीकरण केंद्रे वाढवा
कोरोनापासुन बचाव होण्यासाठी लसीकरण मोहिमेला अधिक गती देण्याची गरज असल्याचे सांगत जिल्ह्यात 57 ठिकाणी लसीकरण केंद्रे असून या लसीकरण केंद्राच्या संख्येत वाढ करण्यात यावी. जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रामधूनही लसीकरण करण्याच्या सूचना करत या केंद्रांच्या माध्यमातून अधिक प्रमाणात लसीकरण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी मास्क, सॅनिटायजरचा वापर तसेच सामाजिक अंतराचे पालन ही त्रिसूत्री अत्यंत प्रभावी असून याबाबत जनमानसांमध्ये होर्डिंग, पॉम्प्लेट तसेच स्थानिक केबलच्या माध्यमातून व्यापक स्वरुपात जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
मोबाईल व्हॅनचे लोकार्पण
दरम्यान, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय मोबाईल मेडीकल युनिट सर्व सोयींनीयुक्त अशा दोन व्हॅनचे लोकार्पण टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात हा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. जिल्ह्यातील दुर्गम भागातील गोरगरीब ज्यांना उपचारासाठी शहरामध्ये येता येत नाही, अशांसाठी या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून आरोग्याच्या सेवा उपलब्ध होणार असून या मोबाईल व्हॅनद्वारे ग्रामीण भागातील जनतेस मोफत आरोग्य सेवा, 0 ते 6 वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी, गरोदर माता व स्तनदा मातांची आरोग्य तपासणी, प्रयोगशाळा, साथजन्य परिस्थितीमध्ये तात्काळ उपचार, आरोग्य विषयक समुपदेशन व उपचार, नियमित लसीकरण तसेच मोफत औषधांचे वाटप करण्यात येणार आहे. राज्यात अशा प्रकारच्या 20 मोबाईल व्हॅन्स कार्यान्वित करण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, माजी आमदार अर्जुनराव खोतकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, पंडित भुतेकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताव सवडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर आदींची उपस्थित होते.

