रश्मी शुक्ला यांच्यावर बिल्डरांकडून खंडणी घेत असल्याचे आरोप केले.
मुंबई: सध्या फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर बंजारा समाजाचे नेते हरिभाऊ राठोड यांनी गंभीर आरोप केले आहेत. रश्मी शुक्ला या पुण्याच्या पोलीस आयुक्त असताना खंडणी गोळा करायच्या, असे त्यांनी म्हटले आहे. पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ यांच्यामार्फत हा सारा कारभार सुरु होता. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर पडदा टाकला, असे हरिभाऊ राठोड यांनी म्हटले.
ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर बिल्डरांकडून खंडणी घेत असल्याचे आरोप केले. पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळ पोलिसांनी प्रॉपर्टी सेलमध्ये बोलावून धमकावत असत. ते रश्मी शुक्ला यांच्या नावाने पैसे मागायचे, असे हरिभाऊ राठोड यांनी म्हटले.
मात्र, रश्मी शुक्ला यांना देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ होते. संदीप जाधव यांनी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात खंडणीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर केवळ धनंजय धुमाळला निलंबित करण्यात आल्याचे दाखवण्यात आले. पण प्रत्यक्षात त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण रफादफा केले. आता मी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याचेही हरिभाऊ राठोड यांनी सांगितले.
‘भाजपसोबत जाण्यासाठी रश्मी शुक्लांनी माझ्यावर दबाव आणला’
सध्या राज्यात गाजत असलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात IPS अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यासंदर्भातील अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला असून त्यामध्ये रश्मी शुक्ला यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर (Rajenda Patil Yadravkar) यांनीही रश्मी शुक्ला यांनी आपल्यावर दबाव आणल्याची कबुली दिली आहे.
मी ही गोष्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या कानावर घातली होती. त्या काळामध्ये मी भाजपसोबत यावे, यासाठी शुक्ला मला भेटल्या होत्या. मात्र, मला शिरोळ तालुक्यातील जनतेने निवडून दिले आहे. त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय मी निर्णय घेणार नाही, असे मी शुक्ला यांना सांगितले. त्यानुसार मेळावा घेऊन, जनतेची मते आजमावून मी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, असे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.

