सचिन वाझेंवर आता ‘ईडी’ची वक्रृष्टी? महागड्या गाड्या, पैसं मोजण्याच्या मशीनमुळे आणखी गोत्यात

0 झुंजार झेप न्युज

सचिन वाझे यांनी एवढ्या महागड्या गाड्या कशा घेतल्या, त्यासाठी त्यांच्याकडे पैसा कुठून आला? 

मुंबई: अंबानी स्फोटक प्रकरणातील मुख्य संशयित सचिन वाझे (Sachin Vaze) आता आणखीनच गोत्यात येण्याची शक्यता आहे. कारण, NIAच्या तपासात सचिन वाझे यांच्याकडे असणाऱ्या अलिशान गाड्यांची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता सचिन वाझे यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाची (ईडी) वक्रदृष्टी वळाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ‘ईडी’कडून आता सचिन वाझे यांच्या बेहिशेबी मालमत्तेची तपासणी होऊ शकते. अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात सचिन वाझे यांच्याकडून मर्सिडीज, प्राडो यासारख्या अलिशान गाड्यांचा वापर झाला होता. साहाय्यक पोलीस निरीक्षक असणाऱ्या सचिन वाझे यांनी एवढ्या महागड्या गाड्या कशा घेतल्या, त्यासाठी त्यांच्याकडे पैसा कुठून आला? सचिन वाझे यांनी गाडीत पैसे मोजण्याचे मशीन का ठेवले होते?, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे NIA सचिन वाझे यांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या तपासाचे प्रकरण ‘ईडी’कडे देऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

परमबीर सिंहांच्या 100 कोटींच्या लेटरबॉम्बची चौकशी करणार?

राष्ट्रीय तपास यंत्रणेनंतर (NIA) आता महाविकासआघाडी सरकारच्या मागे आणखी एका केंद्रीय यंत्रणेचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir singh) यांनी काही दिवसांपूर्वी एक पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि काही पोलीस अधिकाऱ्यांना बार आणि रेस्टॉरंटसकडून 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिल्याचा दावा परमबीर सिंह या पत्रात केला होता.

ही रक्कम खूपच मोठी असल्याने आता सक्तवसुली संचलनालय (ईडी) स्वत:हून या प्रकरणाची चौकशी करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या अडचणीत आणखीनच भर पडू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या ‘ईडी’कडून परमबीर सिंह यांच्या दाव्यातील तथ्य तपासण्याचे काम सुरु आहे. ईडी यासंदर्भातील सगळ्या घडामोडींवर नजर ठेवून आहे. 100 कोटींचा आकडा हा खूपच मोठा आहे. त्यामुळे ‘ईडी’कडून आता याप्रकरणाची चौकशी होऊ शकते. तसे झाल्यास ईडी पोलीस अधिकारी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना चौकशीच्या जाळ्यात खेचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.