नितेश राणे-वरुण सरदेसाई वाद पेटला, भाजप कार्यालयात मोकाट कुत्रे सोडण्याचा युवासेनेचा प्रयत्न

0 झुंजार झेप न्युज

या सगळ्या प्रकारामुळे नाशिकच्या भाजप कार्यालयाबाहेर वातावरण तणावपूर्ण झाले होते. 

नाशिक: शिवसेना नेते वरुण सरदेसाई आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांनंतर नाशिकमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक होताना दिसले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयासमोर अक्षरश: राडा घातला. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयात मोकाट कुत्रे सोडण्याचा प्रयत्न केला. तसेच नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजीही केली. 

या सगळ्या प्रकारामुळे नाशिकच्या भाजप कार्यालयाबाहेर वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच धाव घेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अडवले. मात्र, आगामी काळात हा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे.

नितेश राणे यांनी वरुण सरदेसाई यांचे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याशी आर्थिक लागेबांधे असल्याचा आरोप केला होता. सचिन वाझे बेटिंगवाल्यांकडून पैसे उकळतात. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नातेवाईक असलेले वरुण सरदेसाई यांचा फोन जातो. तुम्ही बुकींकडे जे पैसै मागितले त्यातील आमचा हिस्सा किती?, असे सरदेसाई यांनी वाझेंना विचारल्याचे फोनवरील संभाषण आहे. याप्रकरणाचा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) तपास करावा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली होती.

वरुण सरदेसाईंनी काय म्हटलं?

राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे दाखल आहे, खुद्द फडणवीसांनीच हे मांडलय, आज ते भाजपमध्ये गेलेत तर महाविकास आघाडीतील विविध नेत्यांवर आरोप करत आहेत. गेले काही दिवस ते माझ्यावर वैयक्तिकरीत्या आरोप करत आहेत. राणे कुटुंबीयांना जनता अजितबात गांभीर्यानं घेत नाही. त्यांना भीक घालत नाही, असे वरुण सरदेसाई यांनी म्हटले होते.

त्यांनी जे आरोप केलेत, ते सिद्ध करावेत नाही तर कायदेशीर प्रक्रियेला तयार राहावे, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर अतिशय घाणेरडे आरोप केलेत. ते सगळे आरोप तथ्यहीन असून, त्या आरोपांमुळे मी आमदार नितेश राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकत आहे, असेही वरुण सरदेसाई यांनी सांगितले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.