निलंबित सहायक निरीक्षक सचिन वाझेंबाबत समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी मोठं विधान केलं आहे.
नागपूर: निलंबित सहायक निरीक्षक सचिन वाझेंबाबत समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी मोठं विधान केलं आहे. वाझेंची नियुक्ती होणार असल्याचं कळल्यानंतर मी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत, आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटलो होतो. त्यावेळी त्यांना वाझेंना पोलीस दलात घेऊ नका, अशी विनंतीही केली होती, असा गौप्यस्फोट अबू आझमी यांनी केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अबू आझमी यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी त्यांनी वाझे यांच्या नियुक्तीवरून सरकारवर टीका करतानाच या सर्व प्रकाराला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगच जबाबदार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. वाझेंना पोलीस दलात घेण्यात येणार असल्याचं कळल्याबरोबर मी पवार, राऊत आणि देशमुखांना भेटलो होतो. पण परमबीर सिंग यांनी या दोघांना असा काय सल्ला दिला की त्यांना पोलीस दलात घेण्यात आलं, असं आझमी म्हणाले. वाझेंना घेऊ नये म्हणून मी आंदोलनही केलं होतं, असंही ते म्हणाले.
सरकारची आणखी एक चूक
ख्वाजा युनुस हत्येची केस सुरू असतानाही वाझेंना पोलीस दलात घेणं ही महाविकास आघाडीची सगळ्यात मोठी चूक होती, असं ते म्हणाले. तसेच मी सत्तेत असूनही सांगतो की, ज्या दिवशी वाझेंचा विषय विरोधकांनी हातात घेतला, त्याच दिवशी त्यांना निलंबित करायला हवं होतं. पण वाझेंना निलंबित करण्यात आलं नाही, ही सरकारची दुसरी मोठी चूक होती, असंही त्यांनी सांगितलं.
वाझेंचे कॅरेक्टर वाईट
वाझेंचे कॅरेक्टर पहिल्यापासून वाईट आहे. त्याला परमबीर सिंग दोषी आहेत, असं सांगत आझमी यांनी वाझेप्रकरणाचे खापर सिंग यांच्यावर फोडले.
सिंगच पैसे वसुली करतात
पैसे वसुली प्रकरणात सिंग यांनाच जबाबदार ठरवलं पाहिजे. गृहमंत्री अनिल देशमुखांनी जर अधिकाऱ्यांना पैसे वसुलीचं टार्गेट दिलं होतं. तर सिंग यांनी पवार आणि मुख्यमंत्र्यांना का सांगितलं नाही. सिंग यांनीच पैसे वसुली केली आहे. त्यांच्याविरोधात पैसे वसुलीच्या अनेक केसेस सुरू आहेत, असा दावाही त्यांनी केला.
आणखी एक कार जप्त
दरम्यान, मुकेश अंबानींच्या घराजवळ मिळालेली स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी NIAच्या हाती अजून एक अलिशान गाडी लागली आहे. सचिन वाझे वापरत असलेल्या ऑडी कारचा तपास NIAकडून गेल्या काही दिवसांपासून सुरु होता. NIA आज वसई परिसरातून ही कार जप्त केली आहे. NIA ने मंगळवारीच एक आऊटलॅंडर गाडीही नवी मुंबईच्या कामोठे परिसरातून जप्त केली आहे. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून तपास सुरु असलेली MH 04 FZ 6561 नंबरची ऑडी आज NIAच्या हाती लागलीय.
एकूण 7 गाड्या जप्त
NIAने आतापर्यंत सचिन वाझे यांच्याशी संबंधित 2 मर्सिडीज, 1 प्राडो, 1 ऑडी, इनोव्हा, स्कॉर्पिओसह एकूण 7 गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. NIA या 7 गाड्यांव्यतिरिक्त अजून एक आऊटलँडर आणि स्कोडा गाडीच्या शोधात असल्याची माहिती मिळतेय.

