खाजगी रुग्णालयांनी डॅशबोर्ड अपडेट न केल्यास कारवाई करण्याचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांचे आदेश.
पिंपरी चिंचवड:शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बेडची उपलब्धता कमी पडत असून खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी राखीव बेड ठेवण्यात आले आहेत. परंतु खाजगी रुग्णालयातील बेडची माहिती उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची तारांबळ होत असल्याचे निदर्शनास येत असून खाजगी रुग्णालयांनी वेळीच डॅशबोर्ड अपडेट करावेत, अशा सुचना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना केल्या. यासंदर्भात, दररोज बेडची माहिती महापालिका वॉररुमकडे सादर न करणा-या खाजगी रुग्णालयावर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी प्रशासनास दिले.
शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त यांच्या दालनात महापौर ऊषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले, नगरसेवक संतोष कांबळे, सतिश कांबळे, आयुक्त राजेश पाटील सर, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, डॉ. पवन साळवे, डॉ. वर्षा डांगे, डॉ. राजेश वाबळे आदी उपस्थित होते.

