कोविड लढ्यात प्रशासनासोबत चौथ्या स्तंभाचेही मोठे योगदान-पालकमंत्री कु.आदिती तटकरे
रायगड, दि.2 : गेली जवळपास दीड वर्षे आपण सर्वच जण कोविडशी लढा देत आहोत. या लढ्यात महसूल, आरोग्य, पोलीस प्रशासनाबरोबरच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखले जाणाऱ्या प्रसारमाध्यमांचेही मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या दि.2 जुलै रोजी असलेल्या जयंतीनिमित्त दैनिक लोकमत आणि रायगड पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी भेट दिली,त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गुंजाळ, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सुहास माने, पोलीस विभागातील मुख्यालयातील तसेच क्षेत्रीय स्तरावरील अन्य अधिकारी, कर्मचारी, जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढीचे डॉ.दिपक गोसावी, सौ.मनिषा नवाळे, सौ.पूनम पाटील, श्री.सुनिल बंदीछोडे, श्री.हेमकांत सोनार, श्री.उमेश पाटील, श्री.रविंद्र कदम, श्री.महेश घाडगे, लोकमत चे रायगड कार्यालय व्यवस्थापक समीर कुलकर्णी, जिल्हा प्रतिनिधी अविष्कार देसाई, निखिल म्हात्रे, वितरण प्रमुख शैलेश पाटील, जाहिरात प्रतिनिधी मोहन जाधव यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, स्थानिक प्रशासन आणि लोकमत वृत्तपत्र समूह यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात आजच्या दिवशी हा रक्तदान शिबिराचा स्तुत्य उपक्रम राबविला जात असून या उपक्रमास रायगड जिल्ह्यातून सर्वाधिक चांगला प्रतिसाद मिळाला आहे. साधारणत: 225 रक्तदात्यांनी या शिबिराच्या माध्यमातून रक्तदान केले. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने या सर्वांनी स्वत: रक्तदान करीत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. प्रसारमाध्यमांनी कोविडच्या आव्हानात्मक परिस्थितीत शासनाने दिलेल्या सूचना, नियम यांची इत्यंभूत माहिती जनतेपर्यंत सर्व प्रकारच्या माध्यमांद्वारे, सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या जलद पोहोचविण्याची मोठी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून शासनाला मोलाची मदत केली. त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करणे, ही आपली सर्वांची जबाबदारीच आहे.
यावेळी त्यांनी रक्तदान मोहिमेमध्ये महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त केली. यानंतर पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी पोलीस कवायत मैदानातील सोयी-सुविधांच्या विकासकामांची पाहणी केली व संबंधितांना ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान आज सकाळी “नातं रक्ताचं नातं जिव्हाळ्याचं” या मोहिमेंतर्गत या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते अलिबाग पोलीस मैदानाजवळील जंजिरा सभागृहात पार पडला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गुंजाळ, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सुहास माने, तसेच पोलीस विभागातील मुख्यालयातील तसेच क्षेत्रीय स्तरावरील अन्य अधिकारी, कर्मचारी, जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढीचे डॉ.दिपक गोसावी व त्यांचे सहकारी, लोकमत चे रायगड कार्यालय व्यवस्थापक समीर कुलकर्णी, जिल्हा प्रतिनिधी अविष्कार देसाई, निखिल म्हात्रे, वितरण प्रमुख शैलेश पाटील, जाहिरात प्रतिनिधी मोहन जाधव यांची उपस्थिती होती.
रक्ताची नेहमी गरज भासते अशा थॅलेसिमिया, सिकलसेल रुग्णांची रक्त तुटवड्यामुळे गैरसोय होते. तर गर्भवती माता व अपघातग्रस्तांना देखील आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची गरज भासते. अशा वेळी रुग्णाच्या नातेवाईकांना रक्तदाता शोधणे वा आवश्यक त्या रक्तगटाचे रक्त मिळविणे अतिशय जिकीरीचे होते. आपत्कालीन परिस्थितीतील रक्ताची गरज भासणाऱ्या अशा रुग्णांना जीवनदान देण्याच्या उद्देशाने हे रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
या उपक्रमासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर्स, रोटरी क्लब ऑफ ठाणे इम्पेरियल, नागावचे सरपंच निखिल मयेकर, हर्षदा मयेकर, लवेश नाईक यांचे विशेष सहकार्य मिळाले.

