बांबु वृक्ष लागवडीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा संपन्न बांबु वृक्षाचे रोपण ही काळाची गरज

0 झुंजार झेप न्युज

बांबु वृक्ष लागवडीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा संपन्न बांबु वृक्षाचे रोपण ही काळाची गरज

जालना दि.6: पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सरासरी तापमानात सातत्याने वाढ होत असुन या तापमानवाढीला जीवाश्म इंधनाचे ज्वलन आणि वृक्षतोड या दोन प्रमुख बाबी कारणीभुत आहेत. तापमानवाढीचे होणारे परिणाम हानीकारक असुन मनुष्य जाती कायम टिकण्यासाठी वृक्ष लागवड हाच पर्याय असुन इथेनॉल, वीजनिर्मितीमध्ये अधिक प्रमाणात उपयुक्त असण्याबरोबरच कमी खर्चात, कमी पाण्यात अधिक उत्पन्न देणाऱ्या बांबू या वृक्षांचे रोपण ही काळाची गरज बनली असल्याचा सुर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बांबू वृक्ष लागवड कार्यशाळेत निघाला.

या कार्यशाळेस माजी आमदार तथा राष्ट्रीय ग्रामीण विकास एवं पंचायत संस्थेचे सदस्य पाशा पटेल, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल, रामेश्वर भांदरगे, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बांबू लागवड मार्गदर्शक संजीव करपे, डॉ. कदम, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर यांच्यासह सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, कृषि अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

बांबू वृक्ष लागवडीबाबत मार्गदर्शन करताना पाशा पटेल म्हणाले, औद्योगिकरणामुळे, जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे तसेच वृक्षांच्या तोडीमुळे वातावरणातील कार्बनचा स्तर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ज्या प्रमाणात वृक्षांची तोड केली जाते त्या प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात येत नसल्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. निसर्गाचा समतोल राखला जाऊन अधिक प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती होऊन कार्बनचे उत्सर्जन कमी करणाऱ्या बांबू वृक्ष लागवडीला प्राधान्य देण्याची गरज आहे. बांबू वृक्ष हे अत्यंत कमी पाण्यात व कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारे वृक्ष आहे. एका एकरमध्ये 50 टन बांबुची निर्मिती करता येणे शक्य असुन या वृक्षापासुन वर्षाला 2 लाख 50 हजार रुपयांपर्यंत उत्पादन घेता येते. जालना जिल्ह्याचे वनक्षेत्र अवघे 1.27 टक्के एवढेच असुन जिल्ह्यात अधिकाधिक वृक्षांची लागवड करण्याची गरज आहे. जालना जिल्ह्यातुन गोदावरी, दुधना केळणा, गिरीजा अशा नद्या वाहतात. या नद्यांच्या काठावर बांबू या वृक्षाची लागवड करण्याबरोबरच शासनाच्या पोखरा योजनेंतर्गतही बांबू वृक्षाची अधिकाधिक लागवड करुन जिल्ह्याचे वनक्षेत्र वाढण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही यामुळे नक्कीच भर पडणार असल्याचे सांगत जगाने दखल घ्यावी, असे काम मराठवाड्यात सर्वांनी मिळुन करण्याचे आवाहन करत यासाठी आवश्यक असलेले सर्व तांत्रिक ज्ञान आपण उपलब्ध करुन देण्यास तयार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे म्हणाले, बांबू वृक्ष लागवड ही शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडण्याबरोबरच पर्यावरणाला अधिक फायदेशीर आहे. जालना जिल्ह्यात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असुन प्रत्येक तालुक्यात दर रविवारी एका एकर क्षेत्रावर वृक्ष लागवड करण्यात येते. येणाऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील नदीकाठावर असलेल्या गायरान जमीनीवर बांबू वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात यावे. या कार्यक्रमाकडे केवळ शासकीय कार्यक्रम म्हणून न पाहता बांबू वृक्ष लागवड हे एक मॉडेल व्हावे यादृष्टीकोनातुन जिल्ह्यातील प्रत्येक गावातुन होतकरु अशा शेतकऱ्यांना एकत्रित करत या वृक्ष लागवडीचे महत्व त्यांना पटवुन द्यावे. बांबू वृक्ष लागवडीचा नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेण्याच्या सुचना करत वृक्ष लागवड, पोखरा, रोहयो या शासकीय योजनांची एकत्रतपणे सांगड घालुन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.

कार्बन न्युट्रल सोयायटी करण्यासाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत असुन इलेक्ट्रीकवर चालणाऱ्या वाहनावरही भर देण्यात येत आहे. कोळशाच्या उष्मांकापेक्षा बांबूचा उष्मांक अधिक प्रमाणात असुन यापासुन वीजनिर्मितीबरोबरच इथेनॉलचीही निर्मिती करणे शक्य आहे. बांबुपासुन विविध प्रकारच्या वस्तु तयार करण्यात येत असुन या वस्तुंना बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मराठवाड्यात बांबुपासुन विविध उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्या उभ्या राहिल्या तर बेरोजगारांच्या हाताला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असल्याचेही सांगत जालना येथे जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातुन बांबुपासुन वस्तुंची निर्मिती करणाऱे कोर्स सुरु करुन जिल्ह्यातील होतकरु व बेरोजगार तरुणांना हे प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.  

बांबू लागवड मार्गदर्शक संजीव करपे यांनी बांबुपासुन विविध प्रकारच्या वस्तुंबरोबरच ईमारतीचीही कशाप्रकारे उभारणी करण्यात येते याची पॉवरपॉईंटच्या माध्यमातुन सविस्तर अशी माहिती दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.