▪️ अक्षय तृतीयाचे दिवशी बाल विवाहावर राहणार प्रशासनाची नजर
बाल विवाह रोखण्यासाठी 8888460260 अथवा 1098 यावर माहिती द्यावी
यवतमाळ,दि.27: अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर व इतर दिवशी होणारे बाल विवाह रोखण्यासाठी लग्न कार्यात सेवा देणारे पुरोहित, बौद्धाचार्य, मौलवी, बँड पार्टी, मंगल कार्यालय व्यवस्थापक यांनी बाल कल्याण समिती व चाईल्ड लाईन यांना वेळीच माहिती देवून बाल विवाह रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू यांनी केले आहे.
बालविवाह प्रतिबंधसाठी उपाययोजना व नियोजन करण्याकरीता जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांच्या द्वारे महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात ज्योती कडू यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, अॅड. प्राची निलावार, जिल्हा पुरोहित संघटनेचे रवी चिंचाळे, निशांत पोफळी, गुरुदत्त उपाध्याय, नवनीत जोशी, भारतीय बौध्द महासभेचे रवी भगत, रुपेश वानखडे, बँड पार्टी असोसीएशनचे देवेंद्र वानखडे, दिलीप तेलंग, मंगल कार्यालय व्यवस्थापक अतुल संगीतराव, योगेश भावे, चाईल्ड लाईनचे गायत्री उर्कुटकर, दिलीप दाभाडेकर, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे स्वप्नील शेटे व सुनील बोकसे हे उपस्थित होते.
यावेळी ज्योती कडू यांनी जिल्ह्यात बाल विवाह होऊ नये म्हणून सर्व संघटनांनी ज्यांना आपण सेवा देतो त्या विवाहातील मुलीचे वय १८ वर्ष व मुलांचे वय २१ वर्ष पूर्ण असेल तरच आपण सेवा देण्याचा तसेच बाल विवाह होत असल्यास त्यांची माहिती संबधित यंत्रणांना वेळीच देण्याचे आवाहन केले. यावर सर्व सेवा संघटनांनी बाल विवाह रोखण्यास सहकार्य करण्याचे तसेच बालविवाह हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा असल्याबाबत व त्यासाठी सहकार्य केल्यास एक लाख रुपये दंड व दोन वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षेची तरतुद असल्याची माहिती संबंधीतांना देऊन बाल विवाह रोखण्याचा निर्धार व्यक्त केला.
राज्यात महिला व बाल विकास विभागाद्वारे एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या कलावधीत १३३८ बालविवाहाच्या प्रकरणात कारवाई करण्यात आलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यात या काळात ३५ बालविवाह रोखण्यात आले व यातील दोन प्रकरणात संबधीतावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एप्रिल-2022 या महिन्यातच सहा प्रकरणात जिल्हा बाल संरक्षण कक्ष द्वारे कारवाई करण्यात आलेली आहे.“अक्षय तृतीया ३ मे २०२२ रोजी असल्याने अनेक विवाह या दिवशी पार पाडले जातात व यामध्ये बालविवाह होण्याची शक्यता आहे त्यामुळे बाल विवाह बाबत सर्व नागरिकांनी दक्ष राहावे व बाल विवाह बाबत माहिती असल्यास जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनास तात्काळ माहिती द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी, श्री. अमोल येडगे यांच्या द्वारे करण्यात आले आहे.”
“बाल विवाह बाबत माहिती असल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्षच्या 8888460260 या क्रमांकावर अथवा चाईल्ड हेल्पलाईन 1098 या क्रमांकावर माहिती द्यावी असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी- देवेंद्र राजूरकर यांच्या द्वारे करण्यात आले.”

