• सामाजिक न्यायच्या योजनांची जनजागृती
• घडिपत्रिका व माहिती पुस्तकाचे प्रकाशन
वर्धा,दि.2: सामाजिक न्याय विभागाच्यावतीने मोठ्या प्रमाणावर लोककल्याणकारी योजना राबविण्यात येते. या योजना सर्वसामान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र व कामगार दिनाचे औचित्या साधत जिल्हा क्रीडा संकुल येथे योजनांची माहिती देणारे दालन लावण्यात आले आहे. या दालनाचे उद्घाटन पालकमंत्री सुनील केदार यांच्याहस्ते झाले.यावेळी पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.सचिन ओम्बासे, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी, जात पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी गौतम वाकोडे, समतादुत प्रकल्प अधिकारी दिनेश बारई आदी उपस्थित होते.अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी विविध योजना सामाजिक न्याय विभाग राबवितो. या योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना या योजनांचा लाभ झाला पाहिजे, यासाठी समाजकल्याण विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे यांनी राज्यभर योजनांच्या जनजागृतीसाठी विभागाला निर्देश दिले आहे. त्यानुसार आयुक्त प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनात जनजागृतीची मोहिम राबविण्यात येत आहे.
जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित दालनाचे पालकमंत्र्यांनी फित कापून उद्घाटन केले. समाजकल्याण विभागाच्यावतीने योजनांची माहिती देणाऱ्या घडिपत्रिका तयार केल्या असून त्याचे व योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन देखील यावेळी पालकमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले. या दालनात अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दालनास भेट देणाऱ्यांना देण्यात येते.सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी यांनी यावेळी दालन लावण्यामागची विभागाची भूमिका विषद केली. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये समतादुतांमार्फत योजनांची माहिती देणाऱ्या घडिपत्रिका व पुस्तिका वितरीत करण्यात आल्या आहे. तसेच घडिपुस्तिकेचे वाचन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

